नवीन कायदा म्हणजे ट्रोजनचा घोडा, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांची टीका

सरकार जो नवीन कायदा आणत आहेत तो म्हणजे ट्रोजन घोडा आहे अशी टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी केली आहे. तसेच आपल्या संविधानिक संस्थांना संघ-भाजपच्या जाळ्यातून वाचवण्याचा निर्धार पुन्हा दृढ करूया असेही खरगे म्हणाले.

एक्सवर पोस्ट करून खरगे म्हणाले की, गेल्या 11 वर्षांपासून संघ-भाजपकडून भारताची जपलेली आणि कष्टाने उभारलेली लोकशाही आतून पोकळ करण्याचा एक कटकारस्थानपूर्ण प्रयत्न सुरू आहे. भाजप थेट मतदारांवरच डोळा ठेवून आहे.

सुधारणांच्या नावाखाली निवडणुकीतील फेरफार करून आपल्या संविधानात दिलेला सर्वात महत्त्वाचा मतदानाचा हक्क हिरावून घेण्याचे साधन बनवले जात आहे!

बिहारमध्ये SIR अंतर्गत लाखो लोकांचे, विशेषतः वंचित घटकांचे, मताधिकार काढून घेण्यापासून ते राहुल गांधी यांनी उघड केलेल्या लाजिरवाण्या वोट चोरी पर्यंत भाजपने योजनाबद्ध आणि टप्प्याटप्प्याने निवडणुकांच्या प्रामाणिकतेवर घाला घातला आहे.

खरा डाव 130व्या घटनादुरुस्ती विधेयकात दडलेला आहे. हा एक लेजिस्लेटिव्ह ‘ट्रोजन हॉर्स’ आहे. या प्रस्तावानुसार, आधीच भाजपच्या ताब्यात असलेल्या यंत्रणांद्वारे राज्य सरकारांना ‘भ्रष्ट’ ठरवून केंद्राला निवडून आलेल्या राज्य सरकारांना उलथवून टाकण्याचा अधिकार मिळतो.

30 दिवसांत निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना कायदेशीर मार्गानेच पायाखालची जमीन काढून घेता येत असेल, तर निवडणुकीची काय गरज? असा संदेश यातून दिला जात आहे. म्हणूनच, या आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनी आपण आपल्या संविधानिक संस्थांना संघ-भाजपच्या जाळ्यातून वाचवण्याचा निर्धार पुन्हा दृढ करूया.