क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीचा राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मान

हिंदुस्थानचा युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी प्रत्येक दिवसागणिक नवी यशस्वी पावले टाकत असून अवघ्या 14 व्या वर्षी त्याने विक्रमांची मालिका आपल्या नावे केली आहे. क्रिकेटमधील या चमकदार कामगिरीबद्दल हिंदुस्थान सरकारने त्याला सन्मानित केले असून वैभव सूर्यवंशीला देशातील सर्वोच्च बाल सन्मान मानला जाणारा पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित विशेष कार्यक्रमात या प्रतिभावान तरुणाचा गौरव केला. याच वेळी 26 डिसेंबर रोजी विजय हजारे ट्रॉफीमधील बिहार संघाचा दुसरा सामना सुरू असताना संघाचा हा स्टार फलंदाज दिल्लीमध्ये पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित होता. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही देशभरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मुलांना आणि तरुणांना हा पुरस्कार देण्यात आला असून वैभवला क्रिकेट क्षेत्रातील कामगिरीसाठी हा सन्मान मिळाला. समस्तीपूर, बिहारचा रहिवासी असलेल्या वैभवने आयपीएलमध्ये सर्वात लहान वयात खेळण्याचा आणि सर्वात वेगवान शतक झळकावणारा हिंदुस्थानी फलंदाज बनण्याचा पराक्रम केला आहे. त्याचे नाव जाहीर होताच विज्ञान भवन टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमले. हा क्षण कुटुंबासाठीही अभिमानाचा ठरला असून वैभवचा मोठा भाऊ उज्ज्वल सूर्यवंशीने सोशल मीडियावर पुरस्कार स्वीकृतीचा फोटो शेअर करत राष्ट्रपतिंनी वैभवची स्तुती केल्याचे लिहून आनंद व्यक्त केला.