लाडकी बहीण योजनेचे मेळावे घेऊन मिंधे-भाजप सरकार स्वतःची पाठ थोपटून घेण्यात मश्गूल आहे. मात्र कधी नेट तर कधी वीजपुरवठा खंडित होत असल्याने केवायसीची ‘भानगड’ पूर्ण करताना महिलांची अक्षरशः फरफट होत आहे. त्यातच जव्हारमधील राष्ट्रीयीकृत बँका कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याचे कारण देत आज, उद्या करीत आहेत. त्यामुळे आधार लिंकसाठी रोजच शेकडो महिलांना भरउन्हात रांगा लावाव्या लागत आहेत.
लाडकी बहीण योजनेचे महिन्याला एक हजार पाचशे रुपये महाडीबीटीमार्फत लाभार्थीच्या थेट खात्यात जमा होत आहेत. पाच महिन्यांचे एकूण सात हजार पाचशे रुपये लाभार्थी महिलेच्या खात्यात शासनाने जमा केले आहेत. मात्र बँक खात्याला नसल्याने योजनेसाठी पात्र असलेल्या शेकडो महिलांना अजूनही या योजनेचा लाभ मिळालेला नाही. योजनेसाठी पात्र असूनही अनेक महिला दिवसभर बँक केवायसी व आधार सीडिंगसाठी बँकेत चकरा मारत आहेत, परंतु नॅशनलाईज बँकेचे शाखा व्यवस्थापक कमी मनुष्यबळ असल्याचे कारण सांगत असल्याने अनेक महिलांना रिकाम्या हाताने माघारी जाण्याची वेळ येत आहे. यामुळे अनेक लाभार्थी महिला या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. आधार केवायसीसाठी लाडक्या बहिणी स्टेट बँक ऑफ इंडिया येथे दिवस उजाडण्यापूर्वी येत आहेत. मात्र शाखेतील उद्धट कर्मचारी मनुष्यबळ कमी असल्याचे कारण देत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे.
लोकप्रतिनिधी, नेते मेळावे घेऊन मोकळे
लाडकी बहीण योजनेसाठी काही राजकीय पक्षांनी आपापल्या परीने जाहिरात करत मेळावे घेत महिलांना योजनेविषयी माहिती देत श्रेय घेत आहेत, परंतु बँकेत येत असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी कोणीही पुढे येत नसल्याचा संताप व्यक्त होत आहे.