सुकमामध्ये 16 नक्षलवाद्यांची पोलिसांपुढे शरणागती, सुरक्षा यंत्रणांना मोठे यश

छत्तीसगडमध्ये नक्षलवादाविरोधातील कारवाईत सुरक्षा यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे. नक्षलवादाचा बालेकिल्ला असलेल्या सुकमामध्ये 16 नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढे शरणागती पत्करली. यापैकी सहा नक्षलवाद्यांवर 25 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.

आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये 2 कट्टर नक्षलवाद्यांचा समावेश आहे. पोलिसांनी एका महिला आणि एका पुरुष नक्षलवाद्याचा शोध घेण्यासाठी प्रत्येकी 8 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. त्यांच्याविरुद्ध अनेक गंभीर गुह्यांची नोंद आहे. नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण धोरण व नियाद नेल्ला नर योजने अंतर्गत आत्मसमर्पण केल्याचे पोलीस अधिकाऱयांनी सांगितले. बटालियन आणि ओडिशासारख्या इतर विभागांतील नक्षलवाद्यांनीही आत्मसमर्पण केले. त्यामुळे एक गाव पूर्णपणे नक्षलमुक्त झाले आहे. नक्षलवाद संपवण्यासाठी पोलीस आणि सीआरपीएफने सुरू असलेल्या सततच्या प्रयत्नांना हे मोठे यश मानले जात आहे.

540 नक्षलवाद्यांना वर्षभरात कंठस्नान

केंद्र आणि राज्य सरकारने नक्षलवाद संपवण्यासाठी मागील वर्षभरापासून विशेष मोहीम हाती घेतली आहे. जानेवारी 2024मध्ये मोहीम सुरू करण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत तब्बल 540 नक्षलवाद्यांना ठार मारण्यात आले.