सोलापूर विद्यापीठ परीक्षेत 170 कॉपीबहाद्दर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा शहर व जिह्यातील विवीध परीक्षा केंद्रांवर सुरू आहेत. यात आतापर्यंत तब्बल 170 विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले आहेत.

सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा 6 जानेवारीपासून सुरू झाल्या आहेत. तेव्हापासून आतापर्यंत भरारी पथकाकडून ही कारवाई झाली. विद्यापीठाच्या लॅप्सेस समितीकडे प्रत्येक कॉपी प्रकरणाची सुनावणी परीक्षा झाल्यानंतर होत असते. कॉपी करणाऱया विद्यार्थ्यांनाही या समितीसमोर हजर राहून आपली बाजू मांडावी लागते. यानंतर कॉपी केली का, कॉपीचा प्रकार याकर लॅप्सेस समिती निर्णय घेत असते. दरम्यान, अनेक शहर व जिह्यातील अनेक परीक्षा केंद्रांना प्रत्यक्ष भेट दिली. परीक्षा यंत्रणा सुरळीत आहे का, याची पाहणी केली. माझ्या भेटीत कॉपी केस आढळली नाही, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर यांनी दिली.

बारावी परीक्षा व विद्यापीठाच्या परीक्षा यामुळे ज्या महाविद्यालयात दोन्ही परीक्षा केंद्रे असतील, अशा महाविद्यालयांच्या सोयीसाठी विद्यापीठाच्या परीक्षा सकाळी 9 ते 11 या वेळेत घेण्याचे सांगितले आहे. इतर परीक्षा केंद्रांवर मात्र ठरलेल्या नियोजित वेळेत परीक्षा असतील; पण असा बदल परीक्षा केंद्राने आपल्या अधिकारात केला तरी एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही, अशी काळजी घेण्याची सूचनाही दिली आहे. त्याचबरोबर आधी परीक्षा झाली व हीच प्रश्नपत्रिका उशिराने होणाऱया इतर परीक्षा केंद्रांवर पोहोचल्या तर कॉपी होऊ शकते, ही बाब लक्षात घेऊन लवकर परीक्षा होणाऱया केंद्रावरील विद्यार्थ्यांकडून परीक्षा झाल्यानंतर प्रश्नपत्रिका काढून घेण्याच्या सूचना विद्यापीठाने परीक्षा केंद्रांना दिल्या आहेत. यासाठी गोपनीयतेचे कारण नमूद करण्यात आले आहे.