
उल्हासनगर महापालिकेत हंगामी कामगार म्हणून काम करणाऱ्या 27 कामगारांना 30 वर्षांच्या संघर्षानंतर अखेर न्याय मिळाला. न्यायालयाने या कामगारांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर उल्हासनगर महापालिकेने या 27 पैकी 19 कामगारांना कायमस्वरूपी नोकरीचे नियुक्तीपत्र दिले तर वय ओलांडलेल्या आठ कामगारांच्या मुलांना वारसाहक्काने नोकरी देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
कल्याण घोडेराव, बाबासाहेब लोंढे, गोरख शिंदे, अभिमन्यू खरात, सोमनाथ उबाळे, सर्जेराव टपाल, संजय चांदन, दयानंद लोंढे, अनिल गायकवाड, संतोष अल्हाट, सूर्यकांत ढसाळ, जोसेफ खरात, भगवान गाडे, संजय बाविस्कर, आनंद डोळस, तुळसीराम घेगडमल, रघुनाथ पर-गारे, भगवान अंगरख हे 27 जण अनेक वर्षे महानगरपालिकेत हंगामी कामगार म्हणून काम करत होते. मात्र त्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यात येत नसल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. काही कामगार संघटना न्यायालयात गेलेल्या कामगारांना सहकार्य करत होत्या.
अखेर जवळपास 30 वर्षांनंतर या कामगारांनी न्यायालयीन लढा जिंकला आहे. या कामगारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आयुक्त मनीषा आव्हाळे, अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यालय उपायुक्त दीपाली चौगले यांनी 27 पैकी 19 हंगामी कामगारांना कायमस्वरूपी नोकरीचे नियुक्तीपत्र दिले आहे. या 27 जणांपैकी आठ कामगारांनी नोकरीचे वय ओलांडले आहे. त्यामुळे त्यांच्या मुलांना वारसाहक्काने कायमस्वरूपी नोकरीत घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त दीपाली चौगले यांनी दिली