
शिखर शिंगणापूर येथील श्री शंभू महादेवाच्या यात्रेदरम्यान दोन भाविकांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका भाविकाची ओळख पटली असून, तो बारामती तालुक्यातील आहे. अन्य एका 65 वर्षीय मृत भाविकाची ओळख पटलेली नाही.
विठ्ठल महादेव सागर (वय 45, रा. शिरवली, ता. बारामती) असे मृत भाविकाचे नाव आहे.
शिखर शिंगणापूर येथील श्री शंभू महादेवाच्या यात्रेसाठी राज्यभरातून मोठय़ा प्रमाणात भाविक दाखल झाले आहेत. रविवारी मुंगीघाटातून मानाच्या कावडी वर चढवताना पाय घसरून पडल्याने 13 भाविक जखमी झाल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच सोमवारी यात्रेतील गर्दीमुळे हृदयविकाराचा झटका आलेल्या भाविकाला वेळेत उपचार मिळाला नाही. मंदिरापासून रुग्णालयापर्यंत नेण्यासाठी तब्बल तीन तास लागले. वेळेत उपचार न मिळाल्याने या भाविकाचा मृत्यू झाला. तर, दुसऱया भाविकाचा ग्रामीण रुग्णालयातून इतर रुग्णालयात उपचारासाठी नेताना मृत्यू झाला.



























































