युद्धाचा आणखी भडका उडणार, हिजबुल्लाह-इस्रायल संघर्ष शिगेला; लेबनॉनमध्ये 2,255 लोकांचा मृत्यू

हिजबुल्लाह आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला असून 8 ऑक्टोबर 2023पासून आतापर्यंत इस्रायलच्या हवाई हल्ल्यात लेबनॉनमध्ये तब्बल 2 हजार 255 लोकांचा मृत्यू झाल्याचा आणि जवळपास 10 हजार 524 जण जखमी झाल्याचा दावा लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने केला आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून इस्रायलने लेबनॉनवर पुन्हा हवाई हल्ले वाढवले आहेत. तर दुसरीकडे इराणनेही इस्रायलला पुन्हा हल्ल्याची धमकी दिली आहे. त्यामुळे मध्य आशियात युद्धाचा आणखी भडका उडण्याची शक्यता आहे.

इस्रायलने शुक्रवारी केलेल्या हल्ल्यात 26 लेबनीज नागरिक मारले गेले तर 144 जण जखमी झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही इस्रायलने हल्ले सुरूच ठेवले. या हल्ल्यांमध्ये 13 लेबनी मारले गेले. शनिवारी इस्रायलने बरजा येथे हल्ला केला. येथे बहुसंख्य सुन्नी लोक राहतात. हिजबुल्लाह ही शियांची संघटना आहे. त्यामुळे लेबनॉन युद्धादरम्यान इस्रायलने आतापर्यंत शिया भागांनाच लक्ष्य केल्याचे समोर आले आहे.

हिजबुल्लाहने डागली 300 क्षेपणास्त्रे

इस्रायलने लेबनॉनवर शनिवारी 90 क्षेपणास्त्रे डागली. यात लेबनॉनच्या उत्तरेकडील भागात सर्वाधिक हल्ले करण्यात आले. काही क्षेपणास्त्रे हाइफा आणि अकोको या बंदरांजवळील शहरांवर डागण्यात आली, अशी माहिती शिन्हुआ या वृत्तसंस्थेने लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने दिली आहे. दरम्यान, हिजबुल्लाहने शनिवारी 300 प्रोजेक्टाईल म्हणजेच छोटी क्षेपणास्त्रे डागल्याचा दावा इस्रायलने केला आहे.

अण्वस्त्र ठिकाणांवर आणि सरकारी संस्थांवर सायबर हल्ला

इराण आणि इस्रायलमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. याचदरम्यान शनिवारी इराणच्या अण्वस्त्र ठेवण्यात आलेल्या ठिकाणांवर आणि अनेक महत्त्वाच्या सरकारी संस्थांवर सायबर हल्ला झाला. त्यामुळे देशातील महत्त्वाच्या सेवा ठप्प झाल्या आहेत. इराणच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने सायबर हल्ला केल्याचे समोर आले आहे. 1 ऑक्टोबर रोजी इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर इस्रायल आणखी आक्रमक झाला आहे.

इस्रायलकडून इराणवर करण्यात आलेल्या सायबर हल्ल्यांमुळे इराणमधील न्यायव्यवस्था, महापालिकेसह विविध सरकारी संस्था प्रभावित झाल्या. अण्वस्त्र, इंधन वितरण केंद्र, महापालिका सेवा, परिवहन नेटवर्क आणि बंदरांना टार्गेट करण्यात आले, अशी माहिती इराणच्या सुप्रीम काऊन्सिल सायबरस्पेसचे माजी सचिव फिरोजाबादी यांनी दिली आहे.

इस्रायलकडून गाझा पट्टीवरही हवाई हल्ले सुरू असून शनिवारी केलेल्या हल्ल्यात 19 पॅलेस्टिनी मारले गेले. गेल्या आठवड्यात इस्रायलच्या हवाई हल्ल्यात जवळपास 150 पॅलेस्टिनी मारले गेल्याचा दावा पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाने केला आहे.