न्यूयॉर्कमध्ये हिंदुस्थानी वंशाच्या 2 महिलांवर गोळीबार

पंजाबमधील दोन महिलांवर न्यू जर्सीच्या कार्टेरेट येथील रुझवेल्ट एव्हेन्यूनजीक गोळीबाराची घटना घडली. हिंदुस्थानी वंशाच्या व्यक्तीने केलेल्या या गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाला असून दुसरी महिला गंभीर जखमी असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून मिळत आहे. दरम्यान, न्यूयॉर्कमधील भारतीय दूतावासाने ट्विट करत या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

रुझवेल्ट एव्हेन्यूनजीक घराबाहेर पडत असतानाच जसवीर कौर आणि गगनदीप कौर या दोन बहिणींवर गोळीबार करण्यात आला. याप्रकरणी 19 वर्षीय गौरव गिल या तरुणाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर हत्येचा आरोप करून गुन्हा दाखल करण्यात आला.

गोळीबाराच्या घटनेनंतर दोन्ही महिलांना विमानाने रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण जास्त गंभीर जखमेमुळे जसवीर कौरचा मृत्यू झाला. तरुण आणि पीडित यांच्यात नेमका काय वाद होता किंवा गोळीबार कोणत्या कारणामुळे झाले अद्याप स्पष्ट झाले नाही. या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी प्रशासनाशी संपका&त असल्याचे भारतीय दूतावासाने म्हटले आहे.