रसाळ अन् पिवळे धमक आंबे बघून तोंडाला पाणी सुटत असेल तर सावधान… कृत्रिमरित्या पिकवलेले 200 किलो आंबे जप्त; श्वसनविकारांचा होता धोका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे. बाजारामध्ये फळांच्या राजाचे धुमधडाक्यात आगमनही होत असून एका-एका पेटीसाठी हजारोंची बोलीही लागत आहे. मात्र यंदा खराब हवामान आणि लहरी पाऊस यामुळे आंब्याचे मोठे नुकसानही झाल्याचे दिसले. त्यामुळे ठिकठिकाणी लागणाऱ्या आंब्याच्या आढ्याही अद्याप लागल्याचे दिसत नाही. आंब्याची आवक कमी असल्याचा फायदा घेऊन काही नफेखोर व्यापारी लोकांच्या जीवाशी खेळ करत असून रसायनांचा वापर करून आंबा पिकवला जात असल्याचे समोर आले आहे. अशाच एका रॅकेटचा हैदराबाद पोलिसांनी पर्दाफाश केला असून तब्बल कृत्रिमरित्या पिकवलेला 200 किलो आंबा जप्त केला आहे. या प्रकरणी एका व्यापाऱ्यालाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ‘एनडीटीव्ही‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

गोशामहाल पोलीस ठाण्याच्या पथकाने 3 एप्रिल रोजी चुडी बाजार येथील बालकिशन मंदिर परिसरातील एका गोदामावर छापा टाकला. यावेळी कुणाल नोकटवाले हा व्यापारी ‘डायमंड राइप – इथिलीन रायपनर’ या रसायनाचा वापर करून आंबे वेगाने पिकवत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून कृत्रिमरित्या पिकवलेले 200 किलो आंबे जप्त केले आहेत.

अन्न सुरक्षा नियमांनुसार प्रति 20 किलो आंब्यासाठी इथिलीन रायपनरची 5 पाकिटे वापरण्याची परवानगी आहे. मात्र, अधिक नफा कमावण्याच्या उद्देशाने आरोपी कुणाल हा प्रत्येक 20 किलोच्या ट्रेसाठी 6 पाकिटांचा वापर करत होता. रसायनाचा हा अतिवापर मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. यामुळे श्वसनविकार होण्याचाही धोका असतो. याप्रकरणी पोलिसांनी अन्नातील भेसळ, फसवणूक आणि सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण करण्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करत व्यापाऱ्याला अटक केली आहे. गोशामहाल पोलीस ठाण्याचे एसएचओ बी. श्रावण कुमार यांनी याबाबत माहिती दिली.

हैदराबादचे पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांनी या घटनेवर चिंता व्यक्त करत नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. फळांचा राजा हा भीतीचे फळ बनता कामा नये. केवळ आंबे चमकणारे किंवा गडद पिवळे दिसतात म्हणून ते खरेदी करू नका. रासायनिक पद्धतीने पिकवलेले आंबे बाहेरून आकर्षक दिसत असले तरी ते आरोग्यासाठी विषारी ठरू शकतात, असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, रसायनांचा वापर करून पिकवलेले आंबे खाल्ल्याने घसा खवखवणे, मळमळ, उलट्या, पोटदुखी आणि जुलाब यांसारखे त्रास होऊ शकतात. या फळांच्या नियमित सेवनाने दीर्घकाळात मज्जासंस्था आणि श्वसनप्रक्रियेवरही विपरीत परिणाम होऊ शकतो. नैसर्गिकरित्या पिकलेल्या आंब्याचा रंग सर्वत्र सारखा नसतो, तर रासायनिक आंब्याचा रंग पूर्णपणे एकसारखा पिवळा असतो, हे लक्षात घेऊनच खरेदी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.