गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱया 2031 बसेस फुल

बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबई, ठाणे व पालघर विभागातून कोकणात जाणाऱया चाकरमान्यांनी पहिली पसंती एसटीला दिली आहे. त्यामुळे एसटीच्या 1301 बसेस गट आरक्षणासह एकूण 2031 जादा बसेस आतापर्यंत फुल झालेल्या आहेत.

येत्या 7 सप्टेंबर रोजी श्री गणरायाचे आगमन होत असून मुंबईतील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळातर्फे यंदा 2 सप्टेंबर ते 7 सप्टेंबरदरम्यान 4300 जादा गाडय़ा सोडण्यात येणार असून त्यापैकी 2031 बसेस फुल झाल्या आहेत. मुंबईतून कोकणात थेट आपल्या गावी अगदी वाडी-वस्तीपर्यंत फक्त एसटीच चाकरमान्यांना सुखरूप पोहोचवते. त्यामुळे चाकरमान्यांचा एसटीला तुफान प्रतिसाद मिळतोय. व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना 100 टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना 50 टक्के तिकीटदरात सवलत दिली जात आहे.

एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बस स्थानक व बस थांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱयांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथकदेखील तैनात करण्यात येणार आहेत.