रायगड जिल्ह्यात यंदा 211 ‘तळीये’; पावसाळयात जागते रहो ऽऽऽ, दरडग्रस्त गावांची संख्या वाढली

पावसाळा जवळ आला असतानाच रायगड जिल्ह्यात यंदा 211 ‘तळीये’ असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. गेल्या पाच वर्षांत दरडीपासून धोका असलेल्या गावांची संख्या 103 वरून तब्बल 211 वर गेल्याने हजारो ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाळ्यात जागते रहोऽऽ असा इशाराच जिल्हा प्रशासनाने दिला असून महाड तालुक्यातील सर्वाधिक 75 गावे दरडग्रस्त आहेत. या गावांमधील रहिवाशांची आतापासूनच झोप उडाली आहे.

रायगड जिल्ह्यात डोंगरमाथ्यांवर अनेक घरे असल्याने दरवर्षी पावसाळ्यात या डोंगरांच्या पायथ्याशी राहणाऱ्यांच्या मनात धडकी भरते. निसर्गाचा ढासळलेला समतोल, बेसुमार वृक्षतोड यामुळे यंदा दरडग्रस्त गावांमध्ये वाढ झाली आहे. पावसाळ्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळून वाहतुकीचा खोळंबा झाल्याच्याही घटना घडतात. 22 जुलै 2021 रोजी महाडमधील तळीये या गावात भलीमोठी दरड कोसळून 84 जणांचा जीव गेला. त्या भयानक घटनेच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. केवळ तळीयेच नव्हे तर अशा अनेक घटना रायगडात घडल्याने पावसाळा जवळ आला की ग्रामस्थांचा थरकाप उडतो.

जिल्ह्यातील दरडग्रस्त गावे
रायगड जिल्ह्यात दरड कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता असलेली 211 गावे असून, सर्वात जास्त 75 गावे महाड तालुक्यात आहेत. तसेच पोलादपूर 59, अलिबाग 6, मुरुड 6, पेण 10, पनवेल 3, उरण 1, कर्जत 4, खालापूर 8, रोहा 16, सुधागड 3, माणगाव 7, श्रीवर्धन 7, म्हसळा 6 गावे दरडग्रस्त आहेत.

स्वयंचलित हवामान केंद्रांची स्थापना
रायगड जिल्ह्यात यावर्षी दरडग्रस्त गावांची संख्या वाढल्याने त्याची गंभीर दखल जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. एखादी दुर्घटना घडली तर तातडीने मदत मिळावी यासाठी कोणती खबरदारी घ्यायची याचादेखील आराखडा तयार करण्यात आला आहे, तर प्रत्येक महसूल मंडळ स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन केल्यामुळे पावसाचा अंदाज घेणे शक्य होणार आहे.

‘त्या’ काळ्याकुट्ट घटनांचा आलेख
26 जुलै 2005 मध्ये आलेल्या तालुक्यातील दासगाव, रोहन, जुई, कोंडिवते, अप्पर तुडील या गावांसह पोलादपूर तालुक्यातील कुडपण, कोंढवी, कोतवाल या गावांमध्ये दरडी कोसळण्याची घटना घडली होती. यामध्ये जवळपास 300 जणांचा मृत्यू झाला.

22 जून 2015 रोजी नेरळ मोहाची वाडी येथे दरड कोसळून घडलेल्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 21 व 22 जुलै 2021 रोजी महाड येथे तळीये गावात दरड कोसळून 84 जणांचा मृत्यू झाला. पोलादपूर तालुक्यातील केवनाळे येथे भूस्खलन होऊन पाच जण दगावले, तर साखर सुतारवाडी येथील दरड दुर्घटनेत सहा जणांचा जीव गेला.

आंबेमाची, हिरकणी वाडी, मोहोत, वाघेरी, सवाद, माटवण, डाभीळ येथील शेकडो कुटुंबे विस्थापित झाल्याची दुर्घटना घडली होती.