देशात फक्त 22 टक्के जलसाठा शिल्लक, दक्षिणेत परिस्थिती चिंताजनक

मान्सूनची वाट पाहणाऱया देशाच्या अनेक भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य वाढले आहे. प्रमुख 150 मुख्य जलाशयांमध्ये आता केवळ 39.765 अब्ज घनमीटर एवढाच जलसाठा शिल्लक आहे. या जलाशयांच्या एकूण साठवण क्षमतेच्या केवळ 22 टक्के इतकाच हा जलसाठा आहे.

गेल्या आठवडय़ात या जलाशयांमध्ये एकूण क्षमतेच्या 23 टक्के जलसाठा होता. पण अनेक भागांत तापमानात कमालीची वाढ झाल्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून जलाशयाच्या पातळीत घसरण होत आहे. केवळ 13 टक्के जलसाठा असलेल्या दक्षिणेकडील प्रदेशांना याचा जोरदार फटका बसत आहे.

हिमाचल प्रदेश, पंजाब आणि राजस्थानसह उत्तरेकडील प्रदेशांत, 10 जलाशयांची एकत्रित जिवंत साठवण क्षमता 19.663 अब्ज घनमीटर आहे. तिथे सध्याचा साठा 5.888 अब्ज घमी (क्षमतेच्या 30 टक्के) आहे. गेल्या वर्षी याच काळात 39 टक्के पाणीसाठा होता.

गुजरात आणि महाराष्ट्राचा समावेश असलेल्या पश्चिम विभागात एकूण 37.130 अब्ज घनमीटर क्षमतेचे 49 जलाशय आहेत. त्यात सध्या 8.359 अब्ज घनमीटर (23 टक्के) पाणी साठा आहे, तो गेल्या वर्षीच्या 25 टक्क्यांपेक्षा कमी पण दहा वर्षांच्या सरासरीच्या 21 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

n आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूसह या प्रदेशात एकूण 53.334 अब्ज घनमीटर क्षमतेचे 42 जलाशय आहेत. त्यातील सध्याचा साठा 7.114 बीसीएम (13 टक्के) एवढा ओसरला आहे.