1930 हेल्पलाईनमुळे वाचले 223 कोटी, महाराष्ट्र सायबर पोलिसांना मोठे यश

सायबर गुन्हेगारी झपाटय़ाने वाढू लागली आहे. भामटे विविध क्लृप्त्या लढवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करीत आहेत. परंतु ‘गोल्डन अवर’मध्ये सायबर पोलिसांच्या 1930 या हेल्पलाईनवर संपर्क साधल्यास गेलेले पैसे रोखता येतात. या क्रमांकावर आलेल्या तक्रारींची तत्काळ दखल घेत महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गेल्या काही दिवसांत तब्बल 222.99 कोटी रुपये आरोपींपर्यत जाण्यापासून वेळीच रोखण्यात यश मिळवले आहे.

दररोज राज्यात कुठे ना कुठे नागरिकांची ऑनलाईन माध्यमातून आर्थिक फसवणूक होत आहे. त्यामुळे याची गंभीर दखल घेत महाराष्ट्र सायबर पोलिसांनी नागरिकांच्या मदतीसाठी 1930 हा हेल्पलाईन क्रमांक सुरू केला. या क्रमांकावर दररोज हजारो कॉल्स पोलिसांकडे येत असून आर्थिक फसवणूक झाल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत. वर्ष 2021 ते मे 2024 या कालावधीत आलेल्या तक्रारींनुसार 2379.51 कोटी इतका फसवणुकीचा आकडा पोहोचला होता. त्यापैकी 222.91 कोटी रुपये इतकी रक्कम सायबर पोलिसांनी वेळीच कारवाई करत आरोपींच्या खिशात जाण्यापासून रोखण्यात यश मिळवले.

1930 या क्रमांकावर तक्रार आल्यानंतर सायबर पोलीस आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे झटपट कारवाई करून नागरिकांचे पैसे वेळीच जाण्यापासून थांबवून ठेवत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सायबर भामटय़ांपासून सावध रहावे. तसेच आपली आर्थिक फसवणूक झालीच तर गोल्डन अवरमध्ये तत्काळ 1930 क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.