
सौदी अरेबिया आणि पाकिस्तान दरम्यान एक छुपा संरक्षण करार झाला आहे. या संरक्षण करारानंतर पाकिस्तान आपल्या 25 हजार सैनिकांना सौदी अरबमध्ये तैनात करेल. हे पाकिस्तानी सैनिक कोणत्याही हल्ल्यापासून सौदीचे रक्षण करतील. त्याबदल्यात सौदी अरब पाकिस्तानमध्ये 10 अब्ज डॉलरची मोठी गुंतवणूक करेल. एवढेच नव्हे तर हिंदुस्थान आणि अफगाणिस्तानासोबत सुरू असलेला पाकिस्तानचा तणाव कमी करण्यात मदत करतील.
अलीकडेच पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शेरीफ आणि लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी सौदीचा दौरा केला होता. या दौऱ्यात शहबाज शेरीफ आणि सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी संरक्षण करारावर स्वाक्षऱ्या केल्या. सौदी अरेबियाची सुरक्षा सुनिश्चित करणे आणि त्या बदल्यात पाकिस्तानला आर्थिक सहाय्य करणे हे संरक्षण कराराचे उद्दिष्टय़ आहे. करारानुसार, पाकिस्तान आपल्या सैन्यदलाच्या चार ब्रिगेड सौदीमध्ये तैनात करेल. याशिवाय पाकिस्तान एअरफोर्सच्या दोन स्क्वाड्रन आणि दोन नेव्हल फीटदेखील सौदीमध्ये तैनात केल्या जातील.
सौदी अरबच्या शाही सैन्यासोबत एकत्र येऊन आधुनिक एअर डिफेन्स सिस्टीम आणि रॉकेट फोर्स कमांड बनवण्याची पाकिस्तानची योजना आहे. पाकिस्तान सौदीला लष्करी सामग्री, मोर्टार, टँक, कमी पल्ल्याची मिसाईल देणार आहे. पाकिस्तानचे 25 हजार सैनिक सौदीच्या विविध शहरांत तैनात होतील. प्रत्येक पाकिस्तानी सैनिकाला प्रत्येक महिन्याला 1600 अमेरिकन डॉलर दिले जातील. पाकिस्तानी लष्कराच्या एका ब्रिगेडमध्ये आठ युनिट असतात. प्रत्येक युनिटमध्ये 850 सैनिक असतात. कमांड ऑपरेशनसाठी सौदी-पाकिस्तान मिळून थ्री स्टार जनरल, दोन मेजर जनरल, आठ ब्रिगेडियर तैनात करतील.


























































