मासेमारी न करताच 250 बोटी माघारी मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान; खराब हवामान, वादळी पावसाचा तडाखा

नारळी पौर्णिमेनंतर खुशीत असणाऱ्या मच्छीमार बांधवांच्या आनंदावर आठ दिवसांतच विरजण पडले आहे. चार दिवसांपासून सुरू झालेला वादळी पाऊस आणि खराब हवामान कोकणातील मच्छीमारांच्या जीवावर बेतले आहे. प्रचंड आवाज करत घोंघावणारा वारा आणि मुसळधार पाऊस यामुळे मासेमारी करणे धोक्याचे ठरत असल्याने २५० हून अधिक बोटी मासेमारी न करताच विविध बंदरांत माघारी परतल्या आहेत. यामुळे मच्छी मारांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

दोन महिन्यांच्या मासेमारी बंदीनंतर १ ऑगस्टपासून मासेमारीचा हंगाम सुरू झाला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने खोल समुद्रातील आणि पर्सियन मासेमारी करणाऱ्या शेकडो बोटी विविध बंदरांतून मासेमारीसाठी रवाना झाल्या. मात्र शुक्रवारपासून सुरू झालेल्या वादळी पाऊस आणि खराब बातावरणामुळे शेकडो मच्छीमार बोटी मासेमारी न करताच माघारी परतल्या आहेत.

22 ऑगस्टपर्यंत मासेमारी बंद
वादळी पाऊस व खराब हवामानाची स्थिती २२ ऑगस्टपर्यंत कायम राहणार आहे. तोपर्यंत खोल समुद्रातील आणि पर्सियन मासेमारी बंद ठेवावी लागणार आहे. त्यामुळे नुकसानीचा आणि खर्चाचा मेळ कसा साधावा याचीच चिंता मच्छीमारांना सतावत असल्याची माहिती वेस्ट कोस्ट पर्ससीन नेट असोसिएशनचे संचालक रमेश नाखवा यांनी दिली.