26 लाख लाडक्या बहिणींची छाननी सुरू, बोगस प्रकरणांत कारवाई होणार

विधानसभा निवडणुकांपूर्वी लाडक्या बहिणींना सरसकट पैसे दिले, पण महायुती सरकारकडे निधी नसल्याने आता लाडक्या बहिणींच्या कागदपत्रांची छाननी सुरू केली आहे. त्यानुसार ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा लाभ घेत असलेल्या लाभार्थींपैकी 26 लाख लाभार्थी निकषानुसार पात्र नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे कागदपत्रांची सूक्ष्म छाननी सुरू केली आहे अशी माहिती. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आज एक्स या समाज माध्यमात याबाबतची माहिती दिली. दरम्यान, बोगस लाभार्थी आढळल्यास कारवाई होणार असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्याच्या अनेक जिल्ह्यांत अपात्र महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. यासंदर्भात माहिती आणि  तंत्रज्ञान विभागाने जी प्राथमिक माहिती उपलब्ध करून दिली आहे, त्यानुसार राज्यातील 26 लाख पात्र नसल्याचे दिसून येत आहे. या  लाभार्थी महिला राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील आहेत.

या पार्श्वभूमीवर महिला आणि बालविकास विभागाने 26 लाख  लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र ठरतात किंवा नाही, याची  सूक्ष्म  छाननी क्षेत्रीय स्तरावर सुरू आहे. छाननीअंती या लाभार्थींची पात्रता-अपात्रता स्पष्ट होणार आहे. छाननीअंती जे लाभार्थी अपात्र ठरतील त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यात येईल, असे तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.