
पालघर जिल्ह्यात नोव्हेंबर 2018 पासून भूकंपाची मालिका सुरू आहे. 2019 च्या जानेवारी महिन्यापासून एक-दोन दिवसांआड भूकंपाचे 143 तर 2020 ला जानेवारी ते डिसेंबरमध्ये 97 भूकंपाचे हादरे बसले आहेत. त्यानंतर ही भूकंपाची मालिका सुरूच असून यंदाही चार महिन्यांत 2 हादरे बसले असून सहा वर्षांत तब्बल 264 भूकंपाचे सूक्ष्म, सौम्य धक्के बसल्याने भय इथले संपत नाही… अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे जीवाच्या भीतीने शेकडो आदिवासी रात्री उघड्या माळरानावर आपल्या कुटुंबकबिल्यासह राहत आहेत.
पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी या परिसरात 11 नोव्हेंबर 2018 पासून आजपर्यंत भूकंपाचे सतत धक्के बसत असून या सहा वर्षांत 264 भूकंपाचे सूक्ष्म, सौम्य धक्के बसले आहेत. हे सर्व 2.0 ते 4.0 रिस्टर स्केलच्या दरम्यान आहेत. तलासरी आणि डहाणू तालुक्यातील तलासरी, उपलाट, आमगाव, वडवली, कवाडा, कुझें, सवणे, वसा, करजगाव, धुंदलवाडी, करजविरा, बहारे, आंबोली, आंबेसरी, झाई, बोर्डी, धाकटी डहाणू, वाणगाव, दापचरी, सास्वंद, गांगणगाव, रानशेत, गंजाड परिसरात सर्वाधिक तडाखे बसले. या भूकंपाच्या धक्क्याने 50 किलोमीटरचा परिसर हादरला.
भूकंपाचा केंद्रबिंदू धुंदलवाडीच्या पश्चिमेला जमिनीखाली 5 किमी खोल होता. पण यंदाच्या जानेवारी ते एप्रिल महिन्यात 3.5 तीव्रतेचा भूकंप झाला.
भूकंपाने आणि भूगर्भातून येत असलेल्या गूढ आवाजामुळे भूगर्भात काही घडामोडी, उलथापालथ घडत असल्याने भविष्यात अधिक तीव्रतेचा धक्का बसेल या भीतीने नागरिकांची झोप उडाली आहे.
तीव्र धक्क्यांचा निष्कर्ष
जर्नल ऑफ जिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या आयएसआरच्या अभ्यासानुसार भूगर्भातील पाण्याचा स्तर 10 मीटर वाढल्यामुळे जमिनीतील छिद्रांमध्ये दबाव वाढतो. हा दबाव भूकंपाच्या केंद्रात जातो. अशी क्रिया सामान्यतः जूनमध्ये सुरू होते आणि डिसेंबरमध्ये थांबते. पालघरच्या बाबतीत ते फेब्रुवारीपर्यंत सुरूच राहते. विशेषतः कोकण किनारपट्टीवर जेथे जांभा खडकाचे प्रमाण जास्त आहे तिथे ही भूगर्भातील पाण्याची हालचाल कमी असते. मात्र पालघरात जांभा खडक नसल्याने ही भूगर्भातील हालचाल सुरूच आहे, असा निष्कर्ष अहवालात काढण्यात आला होता.