
अनेकदा छोट्या घरात लोक नाखुशीने राहतात. अनेक गोष्टींशी तडजोड करतात, पण लिडिया रोका या 27 वर्षीय तरुणीला छोट्या घरात ‘आनंदा’ने राहण्याचं तंत्र गवसलं आहे. अवघ्या 77 चौरस फुटांच्या खोलीत राहणाऱ्या लिडियाला तिचं घर कितीही छोटं असलं तरी मनापासून आवडतं. तिला तिची खोली म्हणजे जगातली सर्वात सुंदर जागा वाटते. लिडिया दक्षिण कोरियातील सेऊलमध्ये शिक्षणासाठी राहते. गेल्या अडीच वर्षांपासून ती इथे राहते. तिने सहावेळा घर बदललं.
लिडिया आत्ता जिथे राहते ती भाड्याची जागा आहे. 8 बाय 9 फुटांची छोटीशी खोलीच. दक्षिण कोरियात अशा छोट्या घरांना ‘गोशिवॉन’ म्हणतात. एक पलंग, एक छोटं टेबल, एक खुर्ची, मांडणी, फ्रीज आणि छोटं शौचालय एवढाच या गोशिवॉनचा आवाका. सेऊलमध्ये लिडियासारखे अनेक परदेशी विद्यार्थी गोशिवॉनमध्ये राहतात.
गोशिवॉनमध्ये येण्यापूर्वी लिडियाने आपल्या अनेक वस्तू गरजूंना देऊन टाकल्या. आपल्याला जगण्यासाठी फारच मर्यादित गोष्टींची गरज असते, याचा साक्षात्कार तिला झाला आहे. तिचा अख्खा दिवस कॉलेज, नोकरीत जातो. घरी ती फक्त झोपण्यासाठी आणि आरामासाठी येते.