New Zealand – 2 मशिदीत अंदाधुंद गोळीबार, बांग्लादेशचा क्रिकेट संघ बचावला

सामना ऑनलाईन, ऑकलंड

न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्च भागामध्ये असलेल्या एका मशिदीमध्ये अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये किती जणांचा मृत्यू झालाय हे अजून कळू शकलेलं नाही. तिथल्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोर हा सैनिकाच्या वेशात आला होता. त्याने अॅटोमॅटीक रायफलमधून अंदाधुंद गोळीबार केला.

शुक्रवारी ख्राईस्टचर्चमधील 2 मशिदींमध्ये गोळीबार झाला आहे. पहिली घटना तिथल्या स्थानिक वेळेनुसार दुपारी 3 वाजता झाली तर दुसरी घडना तिथल्या स्थानिक वेळेनुसार दुपारी 3.45 च्या सुमारास झाली. दुपारी 3 वाजता मस्जिद-अल- नूरमध्ये गोळीबार झाला, प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार यामध्ये अनेकजणांचा मृत्यू झाला आहे.

मस्जिद-अल- नूरमध्ये बांग्लादेशचा क्रिकेट संघ नमाज पढायला जाणार होता. गोळीबार झाला तेव्हा हा संघ मशिदीतच होता असं काहींचं म्हणणं आहे. संघाच्या प्रशिक्षकांनी संघातील सगळे क्रिकेटपटू सुरक्षित असल्याचं सांगितलं आहे. बांग्लादेशचा संघ सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर असून या दोन संघांमधील दुसरा कसोटी सामना ख्राईस्टचर्चमध्ये खेळवला जाणार आहे. हल्लेखोराने दुसरा गोळीबार लिनवूडच्या उपनगरातील एका मशिदीत केल्याचं स्थानिक वर्तमानपत्रांनी सांगितलं आहे.

हल्लेखोरांपैकी एक जण हा ऑस्ट्रेलियाचा रहिवासी असावा असा अंदाज आहे. या हल्लेखोराने गोळीबार होत असताना त्याचं सोशल मीडियावर LIVE प्रक्षेपण केल्याचा स्थानिक पोलिसांचा अंदाज आहे. या गोळीबारांच्या घटनांनंतर ख्राईस्टचर्च शहरात प्रचंड घबराट पसरली आहे. स्ट्रीकलँड भागात एका गाडीमध्ये बॉम्ब सापडल्याचीही अफवा पसरली आहे. हल्लेखोरांपैकी एकाने 37 पानांचा कबुलीनामा लिहला असून यामध्ये त्याने हा ‘दहशतवादी हल्ला’ असल्याचं म्हटलं आहे.