जम्मू-कश्मीरच्या कुपवाडामध्ये चकमक, तीन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-कश्मीरमधील कुपवाडामध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीमध्ये तीन दहशतवादी ठार झाले आहेत. सुरक्षा अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

लष्कराच्या चिनार कॉर्प्सने दिलेल्या माहितीनुसार, कुपवाडामध्ये एकाचवेळी दोन ठिकाणी सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये धुमश्चक्री उडाली. माछिल सेक्टरमध्ये झालेल्या चकमकीमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला, तर तंगधार सेक्टरमध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले.

बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास तंगधार सेक्टरमध्ये दहशतवादी दिसल्यानंतर सुरक्षा दलाने शोधमोहीम सुरू केली. त्याचदरम्यान माछिल सेक्टरमध्येही 57 राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांना दोन-तीन दहशतवादी दिसल्याने तिथेही शोधमोहीम सुरू झाली. शोधमोहिमेदरम्यान सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. यात तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यासह राजौरी जिल्ह्यातील लाठी गावातही सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असल्याची माहिती मिळतेय.

राजौरीतील चकमकीबाबत माहिती देताना जम्मू-कश्मीरमधील सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, बुधवारी रात्री साडे नऊच्या सुमारास खैरी मोहरा लाडी आणि दंथाल या गावांमध्ये संशयित हालचाली दिसल्यानंतर शोधमोहीम सुरू करण्यत आली. रात्री पावणे बाराच्या सुमारास दहशतवाद्यांचा ठावठिकाणी कळल्यानंतर परिसराला घेराव घालण्यात आला. यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या दिशेने गोळीबार केला आणि चकमक उडाली. या भागामध्ये दोन-तीन दहशतवादी लपले असून संपूर्ण परिसराला घेराव घालण्यात आला आहे. तसेच अतिरिक्त कुमकही मागवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, एकीकडे जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले सुरुच असून दुसरीकडे निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. जम्मू-कश्मीरमधील निवडणूक तीन टप्प्यात होणार आहे. 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर रोजी मतदान होईल. 4 ऑक्टोबरला निकाल जाहीर होईल.