तिबेटमधील 30 ठिकाणांची नावे बदलणार

गेल्या 7 वर्षांत 4 वेळा अरुणाचलमधील विविध ठिकाणांची नावे बदलणाऱया चीनच्या आगळिकीला आता हिंदुस्थान चीनच्या ताब्यातील तिबेटमधील 30 ठिकाणांची नावे बदलून जशास तसे उत्तर देणार आहे, असे वृत्त ‘द डिप्लोमॅट’ने दिले आहे. संरक्षण मंत्री म्हणून राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री म्हणून एस. जयशंकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर या हालचालींना वेग आला आहे.

नवा नकाशा, नवी नावे

अरुणाचल प्रदेशावर चीनने वारंवार दावा केला आहे. गेल्या काही वर्षांत चीनने अरुणाचलमधील अनेक ठिकाणांची नावे बदलून चिनी नावे ठेवली आहेत. अरुणाचल चीनच्या हद्दीत दाखवणारे नकाशेही प्रसिद्ध केले आहेत. एप्रिलमध्येही येथील 30 ठिकाणांची नावे चीनने बदलली होती. आता हिंदुस्थाननेही तेच पाऊल उचलले आहे.

चिनी तिबेटमधील ठिकाणांची नावे हिंदुस्थानने बदलल्यावर एक प्रकारे संपूर्ण तिबेटवरील मालकीचा मुद्दाच पुन्हा उपस्थित होणार आहे. हिंदुस्थानच्या या कृतीनंतर चीनकडून तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.