थंडी आणि उष्णतेने घेतला 35 हजार लोकांचा बळी, 2001 ते 2019 दरम्यानच्या अभ्यासातून काढले निष्कर्ष

हिंदुस्थानात 2001 ते 2019 दरम्यान अति उष्ण आणि अति थंड वातावरणामुळे किमान 35 हजार लोकांचा मृत्यू झाला, असा निष्कर्ष एका अभ्यासातून काढला आहे. 2001 ते 2019 दरम्यान हिंदुस्थानात उष्माघात आणि थंडीमुळे अनुक्रमे 19 हजार 693 आणि 15 हजार 197 मृत्यू झाले. 2015 मध्ये उष्माघातामुळे 1,907 आणि थंडीमुळे 1,147 लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. डेटा हवामान विभाग आणि नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो व अन्य डेटाच्या वापर करून हे विश्लेषण करण्यात आलंय.

‘जर्नल टेम्परेचर’मध्ये प्रकाशित झालेल्या निष्कर्षांमध्ये उष्माघात आणि अतिथंड तापमानाच्या संपर्कात आल्याने मृत्यूंमध्ये वाढ झाल्याचे नोंदवण्यात आलंय. हरयाणाच्या ओ पी जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटीचे प्रमुख लेखक प्रदीप गुइन म्हणाले की, अति उष्णतेच्या संपर्कात आल्याने होणारे मृत्यू टाळता येण्यासारखे आहेत आणि आरोग्यावर होणारे परिणाम कमी करण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.

ठळक मुद्दे

  • काम करणाऱ्या पुरुषांमध्ये अति तापमानामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले.
  • 2001-2019 च्या कालावधीत अति उष्णतेमुळे होणारे मृत्यू पुरुषांमध्ये तीन ते पाच पट जास्त होते, तर अति थंडीमुळे होणारे मृत्यू महिलांच्या तुलनेत चार ते सात पट जास्त होते, असे संशोधकांनी सांगितले.
  • राज्यनिहाय आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये उष्माघातामुळे सर्वाधिक मृत्यू झाल्याचे आढळून आले, तर अतिथंडीमुळे होणारे सर्वाधिक मृत्यू उत्तर प्रदेश, पंजाब आणि बिहारमध्ये झाले.
  • संशोधनाचे प्रमुख लेखक प्रदीप गुईन म्हणाले, ‘थंडीमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या तुलनेत उष्माघातामुळे होणारे मृत्यू अधिक लक्षणीय आहेत.’
  • ओपी जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटीच्या सार्वजनिक आरोग्य आणि मानवी विकास शाळेतील सहलेखिका नंदिता भान म्हणाल्या की, या आकडेवारीवरून आपल्याकडे उष्णता आणि थंडी कृती योजनांची तातडीची गरज अधोरेखित होते.