भारतात श्वास घेणंही कठीण, प्रदूषणामुळे गेल्या 10 वर्षांत 38 लाख जणांचा मृत्यू

भारतात आता श्वास घेणेदेखील जीवघेणे होत चालले आहे. स्वीडनमधील कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटच्या एका नव्या अहवालानुसार, 2009 ते 2019 या काळात वायुप्रदूषणामुळे देशात तब्बल 38 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच लहान आणि औद्योगिक शहरे आता नवीन प्रदूषण हॉटस्पॉट म्हणून समोर येत आहेत.

कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटच्या संशोधनानुसार, 2009 ते 2019 या दशकात भारतातील एकूण मृत्यूपैकी 25 टक्के मृत्यू वायुप्रदूषणामुळे झाले आहेत. जर जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) कठोर मानक — म्हणजेच प्रति घनमीटर 5 मायक्रोग्रॅम धरले गेले, तर या मृत्यूंची संख्या अंदाजे 1.66 कोटींपर्यंत जाऊ शकते.

कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटचा अभ्यास भारतातील 655 जिल्ह्यांमध्ये करण्यात आला होता, ज्यात सर्व ठिकाणी PM 2.5 चे प्रमाण मानक मर्यादेपेक्षा जास्त आढळले. या अभ्यासात म्हटले आहे की भारतातील संपूर्ण लोकसंख्या अशा भागात राहते जिथे PM 2.5 चे प्रमाण WHO च्या मर्यादेपेक्षा खूपच जास्त आहे. तज्ज्ञ सांगतात की PM 2.5 हे कण अत्यंत सूक्ष्म असतात. केसाच्या जाडीपेक्षा तब्बल 30 पट बारीक जे थेट श्वासाद्वारे फुफ्फुसांपर्यंत आणि रक्तप्रवाहात पोहोचतात. प्रत्येक 10 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर वाढीवर मृत्यूंमध्ये 8.6% वाढ आढळली आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ताज्या आकडेवारीनुसार, आसाम-मेघालय सीमेवरील लहान औद्योगिक शहर बर्नीहाट आता देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर बनले आहे. येथे वार्षिक PM 2.5 पातळी 133.4 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर इतकी नोंदवली गेली आहे.

प्रदूषण आता हंगामी राहिले नाही, तर वर्षभराचे संकट बनले आहे.
दिल्लीस्थित क्लायमेट-टेक स्टार्टअप रेस्पिरर लिव्हिंग सायन्सेसच्या चार वर्षांच्या (2021–2024) अभ्यासानुसार, देशातील 11 मोठ्या शहरांमध्ये PM 10 चे प्रमाण राष्ट्रीय सुरक्षित मर्यादा 60 मायक्रोग्रॅम पेक्षा अनेक पटीने जास्त राहिले. दिल्लीतील आनंद विहारमध्ये हे प्रमाण 313.8 मायक्रोग्रॅम इतके होते, तर पाटण्यात 237.7 मायक्रोग्रॅम नोंदवले गेले. रेस्पिररचे सीईओ रोनक सुतारिया म्हणाले, “आता ही समस्या फक्त हिवाळ्यापुरती राहिलेली नाही. आपण संपूर्ण वर्षभर विषारी हवेत श्वास घेतो आहोत. प्रदूषण कमी करण्यात कोणताही स्थायी बदल दिसत नाही.”