नगर महापालिकेकडे अवघ्या 384 होर्डिंग्जची नोंद; होर्डिंग्जबाबत न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांची अधिकाऱयाला माहितीच नाही

नगर शहरात प्रमुख रस्त्यांलगत, खासगी इमारतींवर उभारण्यात आलेल्या अवघ्या 384 होर्डिंग्जची नोंद महापालिकेकडे उपलब्ध आहे. जाहिरातफलकांबाबत राज्य शासनाने सन 2022मध्ये जारी केलेले नियम डावलून प्रमुख चौकात व रस्त्यालगत मोठय़ा होर्डिंग्जना महापालिकेकडून परवानगी देण्यात आली आहे. होर्डिंग्जमुळे होणारे विद्रूपीकरण टाळण्यासाठी न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची माहितीही मनपाच्या संबंधित अधिकाऱयाकडे नसल्याचे समोर आले आहे.

मुंबई येथे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडे अनधिकृत होर्डिंग्जची माहिती घेतली असता, अशी कोणतीही माहिती मनपाकडे उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. राज्य शासनाने जमिनीवरील व इमारतींवरील जाहिरातफलकांच्या उभारणीबाबत नियमावली दोन वर्षांपूर्वीच निश्चित केलेली आहे. यात अनेक ठिकाणी होर्डिंग्जना परवानगी देण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. शहरातील प्रमुख रस्त्यांलगत मनपाने अनेक जाहिरातफलकांना परवानगी देताना हे नियम डावलण्यात आल्याचे चित्र आहे. तसेच मोठय़ा प्रमाणावर अनधिकृत फलक उभारले जात असताना त्यावर मनपाकडून कोणतीही कारवाई झाल्याची नोंद नाही. त्यामुळे भविष्यात मुंबईसारखी घटना घडल्यावरच मनपाला जाग येणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

दरम्यान, शासनाच्या नियमानुसार दोन किंवा दोनपेक्षा जास्त रस्ते जेथे एकत्र मिळतात, अशा ठिकाणी पोचमार्गाच्या थांबारेषेपासून पुढील किंवा समोरील बाजूस 25 मीटर इतक्या अंतराच्या आत, जमिनीवर उभारलेल्या जाहिरातफलकांची दर्शनी बाजू समोर येईल, अशा प्रकारे कोणताही जाहिरातफलक प्रदर्शित करण्याची परवानगी दिली जाणार नाही, अशी स्पष्ट तरतूद आहे. असे असतानाही पत्रकार चौकात दर्शनी भागात रस्त्यालगत परवानगी देण्यात आली आहे. तसेच रस्त्याच्या बाजूच्या दोन फलकांमधील किमान अंतर हे एक मीटरपेक्षा कमी असता कामा नये, असा नियम आहे. त्याकडेही दुर्लक्ष करून मनपाने फलकांना परवानगी दिली आहे.

होर्डिंग्जच्या ‘स्ट्रक्चरल  ऑडिट’ची कागदपत्रे सादर  करा – आयुक्त डॉ. पंकज जावळे

नगर महापालिका  हद्दीमध्ये उभारण्यात आलेल्या अनधिकृत हार्ंडग्जवर कारवाई होणार आहे. परवानगी घेण्यात आलेल्या हार्ंडग्जचे पाच दिवसांमध्ये ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ची कागदपत्रे सादर करावीत; अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी दिला. शासनाच्या निर्देशानुसार महापालिकेने तातडीने हार्ंडगमालकांची बैठक घेऊन सूचना देत कागदपत्रांची पूर्तता करावी; अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा यावेळी दिला आहे.