राज्यातल्या 277 नर्सिंग कॉलेजपैकी यंदा सात कॉलेजमध्ये एकही प्रवेश नाही, तीन कॉलेज एकट्या बीडमध्ये

राज्याच्या सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील खासगी नर्सिंग महाविद्यालयांमध्ये प्रवेशाचे चित्र चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. राज्यातील 277 खासगी नर्सिंग महाविद्यालयांपैकी तब्बल 47 महाविद्यालयांमध्ये शून्य ते दहा विद्यार्थ्यांपर्यंतच प्रवेश झाले आहेत. यापैकी सात महाविद्यालयांमध्ये एकाही विद्यार्थ्याचा प्रवेश झालेला नाही. विशेष म्हणजे यातील तीन महाविद्यालये बीड जिल्ह्यातील आहेत.

हिंदुस्थान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे. राज्यात यंदा एकूण 294 नर्सिंग महाविद्यालयांमध्ये 16,530 जागा प्रवेशासाठी उपलब्ध होत्या. यामध्ये 17 शासकीय आणि 277 खासगी महाविद्यालयांचा समावेश आहे. शासकीय महाविद्यालयांमधील 1,180 जागांपैकी 1,174 जागा भरल्या असून केवळ 6 जागा रिक्त राहिल्या आहेत. मात्र खासगी महाविद्यालयांमध्ये परिस्थिती वेगळी असून 15,350 जागांपैकी केवळ 9,783 जागांवर प्रवेश झाला आहे. त्यामुळे 5,567 जागा रिक्त राहिल्या असून राज्यभरात एकूण 5,573 जागा रिक्त असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यातील 277 महाविद्यालयांपैकी 47 महाविद्यालयांमध्ये दहा पेक्षाही कमी प्रवेश झाले आहेत. यामध्ये सात महाविद्यालयांमध्ये शून्य प्रवेश असून त्यात बीडमधील तीन, तर यवतमाळ, नांदेड, नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातील प्रत्येकी एका महाविद्यालयाचा समावेश आहे.

जिल्हानिहाय पाहता सांगली जिल्ह्यातील सात महाविद्यालयांमध्ये शून्य ते दहा प्रवेश झाले असून हा आकडा सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ अहिल्यानगर
आणि कोल्हापूर जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. पुणे, नागपूर आणि ठाणे जिल्ह्यांतील प्रत्येकी एका महाविद्यालयात अत्यल्प प्रवेश झाले आहेत, तर नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतील प्रत्येकी दोन महाविद्यालयांमध्ये प्रवेशसंख्या अत्यंत कमी आहे.

विभागनिहाय पाहता, पश्चिम महाराष्ट्रात अशा 47 पैकी 16 महाविद्यालये असून यामध्ये सांगलीतील 7, कोल्हापूरमधील 6, सोलापूरमधील 2 आणि पुण्यातील 1 महाविद्यालयाचा समावेश आहे. मराठवाड्यात एकूण 12 महाविद्यालयांमध्ये प्रवेशसंख्या अत्यल्प असून त्यात बीडमधील 4, नांदेड व छत्रपती संभाजीनगरमधील प्रत्येकी 2, तर धाराशिव, लातूर, जालना आणि परभणीतील प्रत्येकी एका महाविद्यालयाचा समावेश आहे. उत्तर महाराष्ट्रात अहमदनगरमधील 6 आणि नाशिकमधील 2 महाविद्यालये या यादीत आहेत. विदर्भातीलही 9 महाविद्यालयांमध्ये अत्यल्प प्रवेश नोंदवले गेले आहेत.

राज्यात नर्सिंग शिक्षणासाठी उपलब्ध असलेल्या मोठ्या संख्येने जागा रिक्त राहिल्याने खासगी नर्सिंग महाविद्यालयांच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. इतकेच नाही तर वैद्यकीय सेवेसाठी आगामी काळात नर्सचा कमतरता निर्माण होईल अशी भितीही व्यक्त केली जात आहे.