नक्षलवाद्यांविरुद्ध सर्वात मोठी कारवाई; 3 राज्यातील 20 हजार जवानांनी 1 हजार नक्षल्यांना घेरलं, पाच जणांना खात्मा

पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरुद्ध शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे. एकीकडे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांची पाळेमुळे खणली जात असताना दुसरीकडे नक्षलवाद्यांच्या नांग्या ठेचल्या जात आहे. छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरुद्धची सर्वात मोठी कारवाई सुरू असून छत्तीसगड, तेलंगणा आणि महाराष्ट्रातील जवळपास 20 हजार जवानांनी 1 हजार नक्षल्यांना घेरले आहे. बिजापूर जिल्ह्याच्या कॅरेगुट्टा जंगल भागात ही कारवाई सुरू असून आतापर्यंत 5 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश सुरक्षा जवानांना दिले आहेत. त्यानुसार गेल्या काही काळापासून छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरुद्ध मोठी कारवाई सुरू आहे. बिजापूर जिल्ह्यातील कॅरेगुट्टा जंगल भागामध्ये मोस्ट वॉन्टेड कमांडर हिडमा आणि बटालियनचा प्रमुख देवा याच्यासह प्रमुख नक्षलवाद्यांच्या हालचालीची गुप्त माहिती सुरक्षा दलाला मिळाली. यानंतर छत्तीसगड, तेलंगणा आणि महाराष्ट्रातील 20 हजार जवानांनी या जंगलात 1 हजारांहून अधिक नक्षलवाद्यांना घेरले आहे. गेल्या 48 तासांपासून येथे कारवाई सुरू असून आतापर्यंत 5 नक्षलवादी ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या कारवाईत डीआरजी, बस्तर फायटर्स, एसटीएफ, सीआरपीएफ आणि कोब्रा कमांडो सहभागी झाले आहेत. सुरक्षा दलाच्या जवानांनी छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर असणाऱ्या कॅरेगुट्टा जंगलातील टेकड्यांना वेढा घातला असून नक्षलवाद्यांचे पळून जाण्याचे सर्व मार्ग बंद केले आहेत.