जवळच्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला. दोन कार आणि एका रिक्षामध्ये झालेल्या विचित्र 5 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे. उत्तर प्रदेशमधील बाराबंकी जिल्ह्यातील लखनऊ-महमूदाबाद महामार्गावर गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
इरफान, वहिदून निशा, अजिज अहमद, ताहिरा बानो आणि साबरीन अशी मृतांची नावे आहेत. तर शायरा बानो, अक्सा आणि कार चालक वरुणा अशी जखमींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडे दहाच्या सुमारास हा अपघात झाला. फतेहपूरकडून लखनऊच्या दिशेने येणाऱ्या भरधाव कारने आधी एका रिक्षाला धडक दिली. त्यानंतर ही कार समोरून येणाऱ्या कारला धडकली आणि रस्त्याच्या कडेला असणाऱ्या तलावात पडली. या अपघातामध्ये रिक्षातील 5 जणांचा मृत्यू झाला, 3 गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातानंतर तलावामध्ये पडलेल्या कारमध्ये फक्त चालक होता. त्याला वाचवण्यात यश आले आहे. मात्र रिक्षातील एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला.
रिक्षातील लोकं बाराबंकी जिल्ह्यातील कुर्सी भागातील उमरा गावचे रहिवासी होते. ते सर्व जवळच्या व्यक्तीचे निधन झाल्याने त्याच्या अंत्यसंस्काराला जात होता. मात्र रस्त्यातच त्यांच्यावर काळाने घाला घातला. या अपघाताची माहिती मिळताच जिल्हाधिकारी सत्येंद्र कुमार आणि पोलीस अधीक्षक दिनेश सिंह यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींवर ट्रामा सेंटरमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.