जतमध्ये सापडला यादवकालीन शिलालेख, सादेश्वर, त्र्यंबकेश्वर आणि सिंगणेश्वर या देवांना जमीन दान दिल्याचा उल्लेख

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील कुडनूर येथे यादवकालीन हळेकन्नड लिपीतील शिलालेख मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक गौतम काटकर आणि मानसिंगराव कुमठेकर यांना आढळून आला आहे. या शिलालेखात सिंगणापूर गावातील सादेश्वर, त्र्यंबकेश्वर आणि सिंगणेश्वर या तीन देवांना जमीन दान दिल्याचा उल्लेख आहे. पाच वर्षांपूर्वीचे संशोधन संशोधकांनी केले आहे. हा लेख मारुती मंदिराशेजारील रस्त्याशेजारी भंगलेल्या अवस्थेत होता.

जत तालुक्यात चालुक्यकालीन आणि यादवकालीन काही शिलालेख आढळले आहेत. या शिलालेखांवरुन जत तालुक्याचा सुमारे एक हजार वर्षांपूर्वीच्या इतिहासावर प्रकाश पडतो . मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक गेली काही वर्षे जत तालुक्यातील शिलालेखांवर अभ्यास करीत आहेत. यामध्ये त्यांना जत आणि कवठे महांकाळ तालुक्याच्या सीमेवर असलेल्या कुडनूर गावी मारूती मंदिराच्या पश्चिम बाजूस असलेल्या रस्त्यालगत भंगलेल्या अवस्थेतील शिलालेख आढळून आला . कुडनूर येथील बाळासाहेब मासाळ , संतोष पांढरे , सतीश पांढरे यांनी सदरचा शिलालेख गावात असल्याची माहिती प्रा. काटकर आणि कुमठेकर यांना दिली होती .

सदर शिलालेखाचे दोन भाग झाले असून , वरच्या बाजूला गाय , सूर्य-चंद्र व शस्त्र अशी चित्रे कोरली आहे . प्रा . काटकर आणि कुमठेकर यांनी सदर लेख उतरून घेऊन त्याचे वाचन हंपी येथील कन्नड विद्यापीठाच्या शिलालेख शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ . कलवीर मनवाचार यांच्याकडून करून घेतले. या शिलालेखाच्या अभ्यासासाठी महेंद्र बोलकोटगी , सागर कांबळे यांचेही सहकार्य लाभले . शिलालेखात एकूण नऊ ओळी असून , वरील बाजूस चार अस्पष्ट अक्षरे आहेत . सदर लेखात सिंगणापूर येथील श्री सादेश्वर , त्र्यंबकेश्वर आणि सिंघणेश्वर या तीन देवांना बागायत जमीन दान दिल्याचा उल्लेख आहे.कु़डनूर हे गाव दोन ओढ्यांच्या संगमावर वसले आहे. पूर्वी ते तेथून थोड्या अंतरावर होते . त्याला पांढरीचे रान म्हणतात . याच गावाजवळ सिंगणापूरलगत संबंधित तीन मंदिरांना जमीन दिली असल्याने सदरचा शिलालेख कुडनूर गावच्या हद्दीत आला असावा , असे कुमठेकर यांनी सांगितले .

शिलालेख उत्तर यादवकालीन असावा

सध्याच्या कुडनूर गावाजवळच सिंगणापूर गाव असून , या गावात असलेल्या महादेवांच्या तीन स्थानांचा उल्लेख या लेखात आहे. मात्र सध्या अशा नावांची कोणतीही मंदिरे या दोन्ही गावात नाहीत. अक्षरांच्या वळणावरुन आणि लिपीवरून हा लेख उत्तर यादव काळातील असावा . या लेखात सिंघणेश्वर असा उल्लेख आहे . कदाचित तो यादवराजा सिंघण याच्या नावावरून स्थापन केलेल्या मंदिराचा असावा. जत तालुक्यात सिंघणहळ्ळी आणि सिंगणापूर अशी गावांची नावे आढळतात. ती यादवराजा सिंघण याच्या नावावरूनच असावीत, असे मानसिंगराव कुमठेकर यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या