नगर जिल्ह्यात आजपासून पोलीसभरती प्रक्रिया सुरू झाली. जिल्हा पोलीस दलातील 25 पोलीस हवालदार व 39 चालक अशा 64 जागांसाठी ही प्रक्रिया सुरू आहे. यासाठी 5970 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यात 19 ते 27 जून या कालावधीत शारीरिक व मैदानी चाचण्या घेण्यात येणार आहेत.
आज पहाटे पाच वाजता पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर भरती प्रक्रियेला सुरुवात झाली. पोलीस अधीक्षक राकेश ओला व अपर अधीक्षक प्रशांत खैरे यांनी प्रक्रियेची माहिती दिली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर उपस्थित होते.
अधीक्षक ओला म्हणाले, ‘कागदपत्रे, उंची, छाती, वजनमोजणी होऊन त्यानंतर पुढील मैदानी चाचणी करण्यात येत आहे. गोळाफेक व काही चाचण्या मुख्यालयाच्या मैदानावर होत आहेत. त्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. एक हजार 600 मीटर धावण्याची चाचणी अरणगाव ते वाळुंज बायपास रस्त्यावर घेण्यात येत आहे. संपूर्ण चाचणी प्रक्रियेवर सीसीटीव्ही व कॅमेऱ्यांची नजर असेल,’ असे त्यांनी सांगितले. पावसामुळे मैदानी चाचणी घेण्यास अडचणी आल्यास नव्याने तारीख देऊन त्या घेतल्या जातील.
वाहनचालकांची वाहन चालविण्याची चाचणी मागील वर्षीप्रमाणे तपोवन रस्त्यावरील पोलीस प्रशासनाच्या जागेत होत आहे. राज्यभरातून उमेदवार येणार असून, त्यांना ‘महाआयटी’मार्फत वेळापत्रक निश्चित करून देण्यात आले आहे. प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. मात्र, पावसामुळे त्यांची कागदपत्रे व इतर साहित्याचे नुकसान होऊ नये, यासाठी मैदानावर तंबू उभारण्यात येणार असल्याचे अधीक्षक ओला यांनी सांगितले.
राज्यभरात एकाच वेळी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. अनेक उमेदवारांनी एकापेक्षा जास्त ठिकाणी अर्ज केले आहेत. त्यात एखाद्या उमेदवाराला एकाच दिवशी दोन जिल्ह्यांत चाचणीसाठी वेळ दिली असेल, त्यांनी पहिल्या ठिकाणी चाचणी द्यावी. दुसऱया ठिकाणच्या चाचणीसाठी किमान चार दिवसांनी त्यांना तारीख निश्चित करून दिली जाईल. त्यासाठी त्यांना अर्ज करावा लागेल. याबाबत एक ई-मेल आयडी व हेल्पलाइन क्रमांक देण्यात येईल, असेही अधीक्षक ओला यांनी स्पष्ट केले.