
सामना ऑनलाईन । मुंबई
महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई उपनगर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी तब्बल 65 हजार कर्मचारी अहोरात्र काम करीत आहेत. या जिल्ह्यात निवडणुकीची प्रक्रिया राबविण्यासाठी मागील पाच महिन्यांपासून काम सुरू आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी व नोडल अधिकारी राजेंद्र बोरकर यांनी दिली.
मुंबईत सोमवार, 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मुंबई उपनगर जिह्याचा विचार करता महाराष्ट्र राज्यातील हा सर्वात मोठा जिल्हा आहे. उपनगर जिल्ह्यात चार लोकसभा मतदारसंघ आहेत, तर मुंबई शहर जिल्ह्यातील दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा काही भाग या जिल्ह्यात येतो. उपनगर जिल्ह्यात तब्बल 26 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामुळे मुंबई उपनगर जिल्हा हा संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. परिणामी या जिह्यामध्ये निवडणुकीची प्रक्रिया राबवणे हे फार मोठे आव्हान आहे.
- या सर्व प्रक्रियेत प्रथमत माहिती गोळा करताना काही यंत्रणाकडून प्रतिसाद मिळाला नाही, पण अशा यंत्रणांकडे वेळोवेळी पाठपुरावा करून माहिती गोळा करणे फार जिकिरीचे होते, पण सर्व अडचणींवर मात करून कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आल्याचे बोरकर म्हणाले. ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी हे अधिकारी व कर्मचारी नोव्हेंबर 2018 पासून केंद्र सरकार, राज्य सरकार, महापालिका कार्यालय, केंद्र व राज्य सरकारचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नियंत्रक किंवा वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थांकडून माहिती संकलित करण्यात येत आहे. – राजेंद्र बोरकर, निवासी उपजिल्हाधिकारी
- उपनगर जिल्ह्यात 7 हजार 472 मतदान केंद्रे असून 9 हजार 711 मतदान केंद्राध्यक्ष, 9 हजार 711 प्रथम मतदान अधिकारी, 19 हजार 422 इतर मतदान अधिकारी व 9 हजार 711 शिपाई आहेत. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी 48 हजार 555 कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासेल.
- केंद्रीय निवडणूक आयोगाने काही यंत्रणांना निवडणुकीच्या कामातून सूट देण्याबाबत आदेश दिले आहेत. या यंत्रणांच्या कर्मचाऱ्यांना तसेच दिव्यांग व्यक्ती, दुर्धर आधाराने त्रस्त कर्मचारी, गरोदर स्त्रीया, स्तनदा मातांना निवडणुकीच्या कामातून सूट देण्यात येते.
- मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार शेखर घाडगे, विजय तळेकर, वंदना मकू, अयूब तांबोळी असे असंख्य कर्मचारी सहाय्य करीत आहेत.


























































