
नियंत्रण रेषेजवळ पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे 68 तळ सक्रीय असून सुमारे 120 दहशतवादी हिंदुस्थानात घुसण्याच्या तयारीत असल्याची माहिती सुरक्षा दलांतील सूत्रांनी दिली. पुढील काही दिवसांमध्ये घुसखोरीच्या घटना वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन नियंत्रण रेषेजवळ सुरक्षा आणखी कडक करण्यात आली आहे.
सुरक्षा दलांतील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेजवळ कुरापती सुरूच आहेत. कुपवाडा, बांदीपोरा, बारामुल्लाजवळच्या भागात दहशतवाद्यांची 68 तळे सक्रीय झालेली आहेत. त्यामुळे या भागात गस्त वाढविण्यात आली आहे. सीमेवर नाईट व्हिजन कॅमेरे, थर्मल सेंसर, ड्रोनद्वारे टेहळणी इत्यादी करण्यात येत आहे.
घुसखोरी उधळून लावण्याचे आदेश
पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी नियंत्रण रेषेजवळ सक्रीय होत आहेत. नव्या लाँचपॅडमध्ये त्यांना प्रशिक्षित करण्यात येत आहे. कडाक्याची थंडी पडल्यानंतर घुसखोरीचे प्रयत्न होतात. त्यामुळे असे प्रयत्न सीमेजवळच उधळून लावण्याचे आदेश जवानांना देण्यात आले आहेत.




























































