मतदार यादीवर साडेसात हजार तक्रारी, 13 दिवसांत हरकतींचा पाऊस

मुंबई महानगरपालिकेने 20 नोव्हेंबर रोजी जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीवर 13 दिवसांत तब्बल 7 हजार 452 हरकती, सूचना नोंदवण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक तक्रारी एच पूर्व वांद्रेमध्ये तब्बल 1820 हरकती, सूचना नोंदवण्यात आल्या आहेत. इतक्या मोठय़ा प्रमाणात मतदार यादीवर तक्रारी दाखल झाल्यामुळे पालिका आता कशी कार्यवाही करते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादीतील त्रुटी दूर करण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले आहेत. यानुसार 20 नोव्हेंबरपासूनच प्रारूप यादीवर हरकती, सूचनांमध्ये आक्षेप नोंदवण्यात येत आहे. यामध्ये दुबार नावे, चुकीची नावे, प्रभाग बदलला, पह्टो-नाव चुकीचे अशा हरकती-सूचना नोंदवण्यात आल्या आहेत. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीत 103 वेळा एकाच व्यक्तीचे नाव समोर आले होते. शिवाय लाखो मतदारांची नावे दुबार असल्याचेही स्पष्ट झाले होते.

निवडणुकीची कामे करण्यास नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांना येणार नोटीस

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रभाग प्रारूप याद्यांसंदर्भात सुरू असलेल्या कामांना गती द्यावी आणि हरकती सूचना असलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन आवश्यक कार्यवाही करावी असे निर्देश पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी अधिकाऱ्यांना आजच्या बैठकीत दिल्या. तसेच निवडणुकीचे काम करण्यास नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटीस बजावा असे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.