
एसटी महामंडळाच्या मुंबई विभागात आठ वर्षे प्रवासी सेवेत धावलेल्या 35 ‘लालपरीं’ची खेडोपाडय़ात पाठवणी करण्यात आली आहे. आठ वर्षे पूर्ण झालेल्या जुन्या गाडय़ांना मुंबईत प्रवेश नाही. या धोरणाला अनुसरून मुंबई महानगरातील एसटीच्या पाच आगारांतील जुन्या गाडय़ांची गावी रवानगी करण्यात आली आहे. संबंधित गाडय़ा 15 वर्षांची वयोमर्यादा पूर्ण होईपर्यंत मुंबई महानगराच्या वेशीबाहेर प्रवासी सेवेत अविरत धावणार आहेत.
प्रदूषण नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीने देशातील प्रमुख महानगरांत आठ वर्षांच्या जुन्या गाडय़ांच्या वाहतुकीला मनाई आहे. हे धोरण इतर वाहनांप्रमाणे ‘महाराष्ट्राची जीवनवाहिनी’ मानल्या जाणाऱया एसटी महामंडळालाही बंधनकारक आहे. त्याला अनुसरून महामंडळाने मुंबई विभागातून जानेवारी ते डिसेंबर यादरम्यान एकूण 35 एसटी गाडय़ांची गावी रवानगी केली आहे. या गाडय़ांनी मागील आठ वर्षे मुंबई सेंट्रल, कुर्ला, परळ, पनवेल आणि उरण आगारांतर्गत प्रवासी सेवा दिली. परिवहन मंत्रालयाच्या धोरणाला अनुसरून जुन्या गाडय़ांना मुंबई महानगराची हद्द कायमची सोडावी लागली आहे. 35 गाडय़ांपैकी प्रत्येकी 10 गाडय़ा रायगड, पालघर आणि सिंधुदुर्ग या तीन जिह्यांतील आगारांमध्ये पाठवल्या आहेत, तर उर्वरित पाच गाडय़ा रत्नागिरी जिह्यातील प्रवाशांच्या सेवेत धावणार आहेत. गावी पाठवण्यात येणाऱया बसगाडय़ांची 15 वर्षांची वयोमर्यादा पूर्ण झाल्यानंतर त्या गाडय़ा भंगारात काढल्या जातात. गेल्या वर्षी एकही गाडी मुंबई महानगरातून बाहेर पाठवली नव्हती. यंदा एकाचवेळी 35 गाडय़ा आठ वर्षे जुन्या झाल्याने त्यांचा मुंबई विभागांतर्गत सेवेचा कालावधी संपुष्टात आल्याची माहिती एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागातील वरिष्ठ अधिकाऱयांनी दिली.
जुन्या गाडय़ांच्या बदल्यात 48 नव्या गाडय़ांची भर
आठ वर्षे पूर्ण झाल्यामुळे एसटीच्या मुंबई विभागातील 35 गाडय़ांनी कायमचा गावचा रस्ता धरला. त्या बदल्यात बीएस-6 प्रवर्गातील 48 ‘लालपरीं’चा एसटी महामंडळाच्या मुंबई विभागाच्या ताफ्यात समावेश केला आहे. त्यामुळे मुंबई विभागातील लालपरींची संख्या 245 वर पोहोचली आहे. परिवहन मंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे नव्या गाडय़ा ताफ्यात दाखल झाल्यास एसटीची प्रवासी सेवा भक्कम होईल, असा विश्वास एका वरिष्ठ अधिकाऱयाने व्यक्त केला.





























































