उत्तराखंडमध्ये पावसाने थैमान घातले आहे. मुसळधार पावसामुळे भूस्खलनाच्या घटना घडत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे केदारनाथ यात्रा मार्गावर भूस्खलन झाल्याने हजारो भाविक या मार्गावर अडकले आहेत. उत्तराखंडमध्ये एसडीआरएफकडून भाविकांची सुटका करण्यासाठी बचाव कार्य सुरु आहे. आतापर्यंत केदारनाथ यात्रा मार्गावरून 8495 भाविकांची सुखरुप सुटका करण्यात आल्याचे एसडीआरएफ अधिकाऱ्यांनी सांगितले.
गौरीकुंड-सोनप्रयाग पर्यायी मार्ग तसेच केदारनाथ-चौमासी ट्रेक आणि 414 हेलिकॉप्टरद्वारे शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत 1,101 यात्रेकरुंची सुटका करण्यात आल्याचे उत्तराखंड एसडीआरएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी बचाव कार्यावर लक्ष ठेवून आहेत. सीएम धामी यांच्या निर्देशानुसार गढवाल विभागाचे आयुक्त विनय शंकर पांडे यांची केदारनाथ मार्गावरील पायाभूत सुविधा पुनर्संचयित करण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
भूस्खलनामुळे बंद पडलेले चिरबासा हेलिपॅड एसडीआरएफच्या पथकाने पूर्ववत केले आहे. या हेलिपॅडमुळे बचाव कार्यात भरीव मदत झाली आहे, असे एसडीआरएफचे कमांडंट मणिकांत मिश्रा यांनी सांगितले.
मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे चिरबासा हेलिपॅडवरून हेलिकॉप्टर सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली होती. आमच्या टीमने हेलिपॅडवरून मोठमोठे खड्डे भरले असून, हेलिपॅड पुन्हा कार्यान्वित केले. हा बचाव पथकांसाठी मोठा दिलासा आहे, असे मिश्रा म्हणाले. दुपारी 3:30 पर्यंत, आम्ही चिरबासा हेलिपॅडवरून 40 लोकांना वाचवले, असेही मिश्रा यांनी सांगितले.
शुक्रवारी, केदारनाथ ट्रेक मार्गावर आणि केदारनाथ मंदिरात अडकलेललल्या लोकांची सुटका करण्यासाठी गौचर येथे भारतीय वायुसेनेचे चिनूक आणि Mi-17V5 हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले होते.