मराठीचा जयघोष! ग्रंथदिंडीने सातारा नगरी दुमदुमली, आज शतकपूर्व संमेलनाचे दिमाखदार उद्घाटन

>>गजानन चेणगे

ऐतिहासिक सातारा नगरीत होत असलेल्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ आज ‘स्वराज्य विस्तारक छत्रपती थोरले शाहू महाराज साहित्यनगरी’ येथे ध्वजारोहणाच्या मंगल सोहळय़ाने आणि नेत्रदीपक ग्रंथदिंडीने झाला. साहित्याचा जागर करणारी ही ग्रंथदिंडी पाहण्यासाठी राजपथावर  दुतर्फा गर्दी झाली होती.  पारंपरिक वेशभूषेत सहभागी मराठीजन, लोकनृत्यांचे सादरीकरण व अभिजात मराठीच्या जयघोषाने सातारा दुमदुमून गेले. शतकपूर्व संमेलनाचे आज दिमाखदार उद्घाटन होणार आहे.

सातारच्या ऐतिहासिक गांधी मैदानावरून संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रराजे भोसले, संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील, संमेलनाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पूजन करून ग्रंथदिंडीला थाटात सुरुवात झाली. सातारा जिह्यातील विविध पंचायत समित्या तसेच प्राथमिक व माध्यमिक शाळांचे चित्ररथ या ग्रंथदिंडीत सहभागी झाले होते. दिंडीच्या पुढे अश्वारूढ झालेले बाल मावळे पहायला मिळत होते.

लोकसंस्कृतीचा जागर

ग्रंथदिंडीमध्ये ढोलताशांचा गजर झाला. विद्यार्थ्यांनी लेझीम पथकावर ठेका धरला. पोतराज, वाघ्या मुरळी, गोंधळी, पोवाडा, वासुदेव असा पारंपरिक पेहराव घातलेले साहित्यप्रेमी दिसत होते. या माध्यमातून ऐतिहासिक आणि पुरोगामी विचारांचा जागर पाहायला मिळाला.  जिह्यातील विविध प्राथमिक तसेच माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांनीदेखील महापुरुषांची वेशभूषा केली होती. या सर्वांनी साहित्यप्रेमींचे लक्ष वेधले. राजवाडा गांधी मैदान-कमानी हौद-कर्मवीर पथ- पोवईनाका ते शाहू स्टेडियम अशी ही ग्रंथदिंडी काढण्यात आली.  ग्रंथदिंडीमध्ये रथामध्ये संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील, प्रा. मिलिंद जोशी, विनोद कुलकर्णी, प्रसिद्ध लेखक तसेच अमेरिकेतील खासदार श्रीनिवास ठाणेदार बसलेले होते. हे सर्व मान्यवर लोकांचे अभिवादन स्वीकारत पुढे निघाले होते. या ग्रंथदिंडीने सातारकरांची मने जिंकली.

साहित्य संमेलनाचे आज उद्घाटन

 राजधानी सातारा येथे होत असलेल्या शतकपूर्व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा उद्या (दि. 2) सकाळी 11 वाजता ज्येष्ठ लेखिका आणि विचारवंत डॉ. मृदुला गर्ग यांच्या हस्ते होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील, मावळत्या संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, संमेलनाचे स्वागताध्यक्ष मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ होणार आहे.

विविध ‘कट्टय़ांचा’ उत्साह

संमेलनाचे मुख्य आकर्षण असलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन 98 व्या संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते झाले. हजारो पुस्तकांनी सजलेली ही ग्रंथनगरी वाचकांसाठी ज्ञानाचा खजिना ठरत आहे. साहित्याच्या विविध अंगांना स्पर्श करणाऱ्या विविध कट्टय़ांचे उद्घाटनही करण्यात आले.

प्रथमच ब्रेल लिपीतील पुस्तकांचे प्रकाशन

प्रकाशन सोहळय़ात संग्राम निकाळजे यांच्या ‘लोकल टू ग्लोबल’, संजय दुधाणे यांच्या ‘ऑलिंपिकवीर खाशाबा’ यासह ब्रेल लिपीतील संदीप वाकचौरे लिखित ‘शिक्षणाचे पसायदान’, सुहास कोळेकर लिखित ‘रॅगिंगचे दिवस’, चंद्रलेखा बेलसरे लिखित ‘राखणदार’, ‘सत्यपितम’, डॉ. सोमनाथ मुटकुळे लिखित ‘चक्र आणि इतर नाटके’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. विशेष म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या इतिहासात प्रथमच ब्रेल लिपीतील पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.