
सामना प्रतिनिधी । पंढरपूर
भाविक खरेच व्हीआयपी आहेत का याची खातरजमा न करता मंदिर समितीच्या सदस्यांने शिफारस करणे आणि समितीच्या कर्मचाऱ्याने डोळे झाकून दर्शनाचा पास देणे या दोन्ही घटना संशयास्पद आहेत. या प्रकरणात केवळ दलालांवर कारवाई न करता पाससाठी शिफारस करणारा सदस्य अन पास उपलब्ध करुन देणाऱ्या मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संरक्षक कृती समितीचे सचिव गणेश लंके यांनी पोलिसांकडे केली आहे. दरम्यान कालच्या व्हीआयपी पास विक्री प्रकरणी पोलिसांनी कैलास डोके व विजय देवमारे या दोन दलालांना अटक केलीय.
पैसे घेऊन श्री विठ्ठलाच्या व्हीआयपी दर्शनाचा पास विक्री केल्याप्रकरणी पोलीस हवालदार वामन यलमार यांनी कैलास डोके या दलालाविरोधात विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आज दोन्ही दलालांना न्यायालयासमोर उभे केले असता दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दलालाच्या तपासात पोलिसांना मंदिर समितीच्या सदस्यांची नावे पुढे येत असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
व्हीआयपी भाविकांच्या नावाखाली मंदिर समितीच्या कार्यालयातून दररोज तीनशे ते पाचशे पासेस वितरित केले जातात. एकादशी आणि इतर गर्दीच्या वेळी हि संख्या हजारांच्या घरात जाते. हे पासेस वितरित करण्यासाठी मंदिर समितीच्या सदस्यांच्या शिफारस आहेत. व्हीआयपी पासेस वितरित केल्याचे रेकॉर्ड देखील मंदिर समितीकडे उपलब्ध आहे.
सहा महिन्यापूर्वी दैनिक सामनाने स्टिंग ऑपरेशन करून व्हीआयपी दर्शन पास विक्रीचा भांडाफोड केला होता. या बातमीचे पडसाद विधानसभेपर्यंत उमटले होते. मात्र मंदिर समितीने या प्रकरणात जुजबी कारवाई करून प्रकरण दडपले. या घटनेनंतर नव्या जोमाने दलाल आणि समितीचे काही सदस्य व्हीआयपी दर्शन पास विक्रीच्या धंद्याला लागले होते. मात्र पोलीस हवालदार वामन यलमार यांच्या सावध कारवाईमुळे दलाल पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत.































































