
सामना ऑनलाईन,नवी दिल्ली
हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लि. (एचएएल)कडून 30 हजार कोटी रुपयांचे कंत्राट काढून घेऊन ते एका ‘अकुशल’ व्यक्तीला देणे हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘स्किल इंडिया’ आहे, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘राफेल’वरून आज मोदींवर पुन्हा हल्ला चढवला.
हिंदुस्थानातील बेरोजगारीचे सध्याचे प्रमाण मागील 20 वर्षांतील सर्वात अधिक आहे याकडे लक्ष वेधताना एका अमेरिकन वेबपोर्टलवरील वृत्ताकडे त्यांनी ट्विटरवरून सगळय़ांचे लक्ष वेधले आहे. देशातील करोडो कुशल तरुण बेकारीशी झुंजत असताना ‘स्किल इंडिया’चा नारा देणाऱया मोदी सरकारने ‘एचएएल’कडून कंत्राट काढून घेऊन ते एका ‘अकुशल’ व्यक्तीला दिले आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
राफेल डील- फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी केले हात वर
हिंदुस्थान आणि फ्रान्स यांच्यात राफेल करार झाला तेव्हा आपण सत्तेवर नव्हतो, असे सांगत फ्रान्सचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांनी त्या सौद्याबाबत हात वर केले आहे. ते संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेवेळी पत्रकारांशी बोलत होते.
फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांनी केलेल्या आरोपानुसार हिंदुस्थानच्या सरकारने अनिल अंबानींच्या ‘रिलायन्स डिफेन्स’ कंपनीला पार्टनर म्हणून निवडण्यासाठी फ्रेंच सरकार किंवा डसॉल्टकडे शिफारस केली होती काय, असा सवाल मॅक्रोन यांना पत्रकारांनी केला. पण त्यावर त्यांनी थेट उत्तर देण्याचे टाळत हात वर केले.
दरम्यान, राफेल फायटर विमानांच्या खरेदी व्यवहारात हिंदुस्थानी कंपनीची निवड करण्यात आमची कोणतीही भूमिका नव्हती. करारासाठी हिंदुस्थानातील कुठल्या कंपनीला भागीदार म्हणून निवडायचे त्याचे स्वातंत्र्य फ्रेंच कंपनीला आहे, असे फ्रान्स सरकारने आज स्पष्ट केले.
राफेल व्यवहारात मोदींचा थेट संबंध नाही!
राफेल सौद्यावरून मोदी सरकारची कोंडी करण्यासाठी काँग्रेसने रान उठवले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींच्या मदतीला धावून जात विरोधकांना मोठाच धक्का आज दिला. राफेल फायटर विमानांच्या व्यवहाराशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वैयक्तिक संबंध नाही, असे सांगतानाच मोदी यांच्या हेतूबद्दल जनतेच्या मनात संशय नाही अशी क्लीन चिटच पवार यांनी दिली आहे. इतकेच नव्हे तर, विमानाची तांत्रिक माहिती जाहीर करण्याची मागणी योग्य नाही असे सांगत त्यांनी विरोधकांना फटकारले आहे. पवार यांच्या या नव्या भूमिकेमुळे सगळय़ांच्याच भुवया उंचावल्या आहेत. राफेल विमानांची किंमत मात्र जाहीर केली पाहिजे असे सांगून पवार म्हणाले की, या व्यवहाराची संसदीय समितीमार्फत चौकशी होण्यास काहीच हरकत नाही.

























































