गुत्ती सौर ऊर्जा प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेस प्रारंभ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो प्रातिनिधीक

सामना प्रतिनिधी । जळकोट

गुत्ती (ता.जळकोट) येथे नऊ मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असून डिसेंबर महिना अखेरपर्यंत हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण होणार आहे. दुष्काळग्रस्त व डोंगरी तालुका प्रकाशमान होण्यास यामुळे मदत होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद सदस्या अनिता शिवाजीराव परगे यांनी दिली.

या प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे गुत्ती परिसरातील नागरिकांतून आनंद व्यक्त होत आहे. हा प्रकल्प डिंसेबर अखेरपर्यंत साकार होईल, असे अनीता परगे यांनी सांगितले.

जिल्हा परिषद निवडणुकीत दिलेले वचन आपण पूर्ण करीत असल्याचे सांगून त्या पुढे म्हणाल्या की, प्रकल्पासाठी लागणारी जमीन संपादन करण्याच्या कामाला बुधवार दि. 26 सप्टेंबर रोजी प्रारंभ करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी लागणारी जमीन संपादन करण्यासाठी शेतकर्‍यांकडून अडचणी येऊ नयेत, यासाठी अधिकार्‍यांना सोबत घेऊन अनिता परगे व भाजप नेते शिवाजीराव परगे हे स्वत: दोन दिवसापासून जमीन संपादन करण्यासाठी कार्यस्थळावर तळ ठोकून उभे आहेत.

गुत्ती येथे पारंपरिक ऊर्जास्रोतापासून वीज निर्मिती करण्यासाठी हा सौरऊर्जा प्रकल्प महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री सौरऊर्जा वाहिनी योजने अंतर्गत मागील वर्षी मंजूर करण्यात आला आहे. मात्र काम सुरू झाले नव्हते. त्यामुळे भूमी अभिलेख विभाग व महाजेनको कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे सतत पाठपुरावा करून अनीता परगे यांनी भूसंपादन प्रक्रियेला गती दिली आहे.

या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी सौरऊर्जा प्रकल्पाचे अभियंता नाईक, मुंजेवार, मुंडे, कार्यकारी अभियंता मारमवार, भूमी अभिलेख विभागाचे उप-अधीक्षक आर. पी. लोखंडे (जळकोट), मुख्यालय सहाय्यक एल. एन. पाईकराव, रामदास मगर, घोणसी सज्जाचे तलाठी डी. एच. करमले, गुत्तीचे ग्रामसेवक दिनकर कबाडे, ग्रा. पं. सदस्य गौतम सूर्यवंशी, काशीबाई चव्हाण, यशवंत पाटील हे परिश्रम घेत आहेत.

यावेळी डॉ. सीताराम, बालाजी केंद्रे, किशोर गिरी, केवळबाई सूर्यवंशी, कमलाकर सूर्यवंशी, सत्यवान पांडे, मंगेश हुंडेकर, यादवराव केंद्रे, उमाकांत डावळे, विश्वनाथ पाटील, नामदेव चव्हाण, गोविंद चव्हाण, वसंत चव्हाण, चंदर राठोड, सीताराम राठोड, ज्ञानोबा देउळवाडे, प्रल्हाद सातपुते, गोपीनाथ केंद्रे आदी जण उपस्थित होते.

गुत्ती हा डोंगराळ भाग असून येथे जी निरोपयोगी शासकीय जमीन आहे, त्याचा उपयोग या मतदारसंघातील लोकांना व्हावा व या परिसर भारनियमनमुक्त व्हावा, यासाठी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या मदतीने हा प्रकल्प साकार होत असल्याची प्रतिक्रिया अनीता परगे यांनी दिली.