कोरठणला सोमवती पर्वणी उत्सव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

राज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या पारनेर तालुक्यातील पिंपळगावरोठा येथील श्री कोरठण खंडोबा सोमवती अमावास्या पर्वणी उत्सव (दि. ८) रोजी होणार आहे. सहा महिन्यांतून एकदा येणाऱ्या सोमवारच्या अमावास्येला खंडोबा दरबारी पौराणिक व धार्मिक महत्त्व आहे. यादिवशी हजारो भाविक देवदर्शन घेऊन कुलधर्म व कुलाचार करतील.

सोमवारी (दि. ८) रोजी सकाळी श्री खंडोबा स्वयंभू मूर्तीचे मंगलस्नान व पूजा झाल्यानंतर महाअभिषेक व आरती होऊन भाविकांना श्री खंडोबाचे दर्शन खुले करण्यात येणार आहे. श्री खंडोबा मंदिरातून सोमवती पर्वणी गंगास्नानासाठी खंडोबा उत्सव मूर्तीची पालखी मिरवणूक वाजत- गाजत प्रस्थान करणार आहे. प्रवेशद्वार स्वागत कमानीपासून उत्सवमूर्तीसह पालखी नवीन शाही रथातून टाक्याचा दरा येथे प्रस्थान करेल.

यावेळी ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या जयघोषात भाविक पालखीपुढे ओलांडा घेतात. लंगर तोडल्यावर भाविक पालखीवर भंडारा-खोबऱ्याची उधळण करतात व पालखी डोंगरावरून खाली उतरण्यास सुरुवात होते. पालखी मिरवणूक हजारो भाविकांसह टाक्याचा दरा येथे आल्यावर उत्सवमूर्तीचे पंचामृताने ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषात पूजन करून गंगास्नान घालण्यात येणार आहे. त्याचवेळी भाविक आपल्या घरातील टाक स्वरूपातील देवांनाही गंगास्नान घालतात. त्यानंतर सार्वजनिक तळीभंडार, महाआरती होऊन पालखी मिरवणूक मंदिरात परत येते.

सकाळी बारा वाजल्यापासून घुले, मुंढे शिंदे, खोसे, डावखर, घोडके या परिवाराकडून भाविकांना आमटी-भाकरीचा महाप्रसाद देणार आहे. ग्रामस्थ भाकरीचा प्रसाद आणतात. तर जय मल्हार विद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक प्रसाद वाटप करणार आहेत. देवस्थान समितीकडून भाविकांना पिण्याचे पाणी, दर्शन, वाहनतळाची व्यवस्था केली आहे. तरी सर्वांनी या उत्सवात देवदर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानतर्फे अ‍ॅड. पांडुरंग गायकवाड, गंगाराम बेलकर, महेंद्र नरड, मनीषा जगदाळे, हनुमंत सुपेकर यांनी केले.