
सामना प्रतिनिधी । पाथर्डी
राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत बीड जिल्ह्यातील घाट सावरगाव येथे दसरा मेळावा मोठ्या उत्साहात एकीकडे संपन्न होत असताना दुसरीकडे याच दिवशी तालुक्यातील भगवान गड येथील भगवान बाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी राज्यभरातून आलेल्या भाविकांची रीघ लागली होती.
भगवान गडाचे महंत नामदेवशास्त्री व पंकजा मुंडे यांचे मतभेद झाल्या नंतर नामदेवशास्त्री यांनी भगवान गडावर भाषणबंदीचा निर्णय जाहीर केल्याने गेल्या वर्षी पासून पंकजा मुंडे यांनी भगवान बाबांचे जन्मस्थळ असलेल्या बीड जिल्ह्यातील घाट सावरगाव येथे दसरा मेळावा घेण्यास सुरवात केली आहे. दसऱ्याच्या दिवशी भगवान गडावर स्व. गोपीनाथ मुंडे व त्या नंतर पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत दसरा मेळावा मोठ्या उत्साहात साजरा होण्याची अनेक वर्षांची परंपरा खंडित होऊन ती प्रथा घाट सावरगाव येथे सुरु झाल्याने भगवान गडावर नेमके किती भाविक दसऱ्याच्या दिवशी येतात या विषयी उत्कंठा निर्माण झाली होती.
या दिवशी भगवान गडावर पोलीस संरक्षण देण्यास तयार असताना सुद्धा नामदेवशास्त्री यांनी ते घेण्यास नकार दिला. या दिवशी सकाळी सात वाजल्या पासूनच गडावर भाविकांची भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी रीघ लागली होती तर सकाळी दहा च्या सुमारास केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ढाकणे हे आपल्या शेकडो समर्थकांसह गडावर आले व त्यांनी आपल्या पत्नी जी.प. सदस्या प्रभावती ढाकणे यांच्यासह भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन नंतर नामदेवशास्त्री यांचे दर्शन घेतले.
सकाळी सात वाजल्या पासूनच नामदेवशास्त्री हे अनेक वर्षांच्या खंडानंतर गडावरील सभागृहात बसून राहिले होते. भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्या नंतर भाविक सभागृहात येऊन नामदेवशास्त्री यांचे दर्शन घेत होते. सकाळी बारा पर्यंत आलेल्या काही भाविकांनी समाधीचे व नामदेवशास्त्री यांचे दर्शन घेतल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या मेळाव्याकडे जाणे पसंद केले. या नंतर गर्दीचा ओघ आटेल असे वाटत होते मात्र त्यानंतरही भाविक जथ्या जथ्याने गडावर येतच होते. आलेल्या भाविकांशी नामदेवशास्त्री अगत्याने विचारपूस करत असल्याचे चित्र या वेळी पाहावयास मिळाले तर काही भाविकांनी नामदेवशास्त्री यांच्या समवेत सेल्फी व फोटो काढले.
पंकजा मुंडे यांचे कार्यक्षेत्र असलेल्या परळी येथून सुद्धा काही भाविक आले होते. सावरगाव येथील मुंडे यांचा मेळावा संपल्यानंतर या मेळाव्याला गेलेले काही भाविक सुद्धा येताना भगवान गडावर आले व त्यांनी समाधी व नामदेवशास्त्री यांचे दर्शन घेणे पसंद केले. दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी गडावर पिण्याच्या पाण्याची व भोजनाची सोय करण्यात येत असते मात्र या वर्षी अशी सोय करण्यात आली नव्हती.
मुंडे यांच्या सावरगाव येथील मेळाव्याचे तालुक्यातील सर्व साधू संतांना तसेच नामदेवशास्त्री यांना सुद्धा निमंत्रण देण्यात आले होते मात्र त्यांनी सावरगावला जाणे टाळले. काही भाविकांनी या दिवशी नामदेवशास्त्री यांना तुम्ही घेतलेला निर्णय योग्य असल्याच्या तसेच गडाचा श्वास आता मोकळा झाला असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. आज झालेल्या गडावरील गर्दी विषयी आपले काय मत आहे, असे नामदेवशास्त्री यांना विचारले असता जे सत्य आहे ते तुम्ही छापा मी या विषयावर काहीही बोलणार नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. या दिवशी सकाळी साडेआठ वाजता महापूजा, दुपारी १२ वाजता समाधीला नैवेद्य दाखवण्यात आला तर सायंकाळी सीमोल्लंघनाचा कार्यक्रम होऊन रात्री गुरुमंत्र देण्याचा कार्यक्रम पार पडला.































































