लातूर जिल्हा खुल्या कारागृहाचे उद्घाटन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

जिल्हा कारागृहातील बंदी असलेल्या कैद्यांच्या सुनावणीसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सची सुविधा जिल्हा कारागृह व प्रत्येक न्यायालयात उपलब्ध आहेत. तसेच लातूर शहर व्यतिरिक्त इतर तालुकास्तरीय न्यायालयात कैद्यास हजर करणे अपुऱ्या पोलीस बळामुळे अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व न्यायालयाने अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून पुढील कालावधीत कैद्यांच्या सुनावण्या या व्ही.सी द्वारे घ्याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले.

जिल्हा कारागृहात आयोजित अभिविक्षक सल्लागार मंडळाच्या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हा कारागृह अधीक्षक जी.व्ही.पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक काकासाहेब डोळे, अभियंता तावशीकर, जिल्हा परिविक्षा अधिकारी दिलीप कारभारी, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर बनशेळीकर, डॉ. बनसुडे अभिविक्षक, सल्लागार मंडळाचे सदस्य अशोक चिंचोले, पार्वती सोमवंशी महापालिका उपायुक्त गायकवाड, अभिविक्षक, कारागृहाचे अधिकारी मधुकर चौधरी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्रीकांत पुढे म्हणाले की, जिल्हा कारागृह प्रशासनाने ही प्रत्येक न्यायालयात सुनावणीसाठी कैदी पाठवण्यापूर्वी तेथील प्रशासनाशी व्ही.सी. द्वारे संबंधित कैद्याची सुनावणी घेण्याबाबत चर्चा करावी. व पुढील काळात पोलीस प्रशासनावरील ताण कमी करुन, अद्यावत तंत्रज्ञान वापरणे व सुरक्षितेच्या दृष्टीने जास्तीत जास्त सुनावण्या हया व्ही.सी.द्वारे घ्याव्यात यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश त्यांनी दिले.

मराठवाड्यात संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण कारागृहानंतर लातूर जिल्हा कारागृहात कैद्यांसाठी खुले कारागृह निर्माण करण्यात आले आहे. या कारागृहाचे उद्घाटन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व सरस्वतीदेवी महिला मंडळ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने लातूर जिल्हा कारागृहात पुरुष कैद्यांसाठी शिलाई मशीन प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विधी प्राधिकरणाचे सचिव संजय चौंदते हे उपस्थित होते.