पदाचा गैरवापर केल्याबाबत खिडकी ग्रामपंचायत ग्रामसेवक निलंबित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अलिबाग

ग्रामसेवक पदाचा गैरवापर केल्याबाबत खिडकी ग्रामपंचायत ग्रामसेवक गणेश विठ्ठल भोईर याला मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती अलिबाग यांच्या अहवालानुसार निलंबित केले आहे. खिडकी गावचे ग्रामस्थ साईनाथ म्हात्रे यांच्या वडिलांचे मृत्यू पत्र देण्यास टाळाटाळ व पोयनाड ग्रामपंचायत मध्ये असताना केलेली 82 हजार 500 च्या गैरव्यवहाराबाबत गणेश भोईर याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

साईनाथ म्हात्रे हे गणेशपट्टी, खिडकी या गावचे रहिवासी आहेत. साईनाथ यांचे वडील प्रभाकर म्हात्रे 6 सप्टेंबर रोजी रेवस बोडणी येथे गेले असता त्यांना हृदयविकाराचा झटका आला. प्रभाकर म्हात्रे यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर प्रभाकर म्हात्रे यांच्यावर खिडकी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. खिडकी ग्रामपंचायत ग्रामसेवक गणेश भोईर यांनी प्रभाकर म्हात्रे यांच्या मृत्यूची नोंद वहीत केली होती.

साईनाथ म्हात्रे यांनी 29 सप्टेंबर रोजी आपल्या वडिलांचा मृत्यूचा दाखला मिळावा यासाठी खिडकी ग्रामपंचायतमध्ये अर्ज केला होता. मात्र खिडकी ग्रामपंचायत सरपंच यांनी प्रभाकर म्हात्रे यांचा मृत्यू रेवस येथे झाला असल्याने ग्रामसेवकास दाखला देण्यास मनाई केली. त्यानुसार ग्रामसेवक यांनी जन्म मृत्यू नोंदवहीत केलेली म्हात्रे यांची मृत्यूची नोंद रद्द केली. याबाबत साईनाथ म्हात्रे यांनी पंचायत समिती व रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती.

पंचायत समिती अलिबागचे गटविकास अधिकारी यांनी याबाबत चौकशी करून अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर यांच्याकडे सादर केला. गटविकास अधिकारी यांनी दिलेल्या अहवालात जन्म मृत्यू अधिनयमाप्रमाणे सरपंचास कोणताही अधिकार नसताना ग्रामसेवक गणेश भोईर यांनी सरपंच यांच्या सांगण्यावरून मृत्यूची नोंद नोंदवहिमधून रद्द केली आहे. त्यामुळे ग्रामसेवक याप्रकरणी दोषी आढळत आहे असा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर याना पाठविला होता.

या अहवालानुसार रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर यांनी गणेश भोईर यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच पोयनाड ग्रामपंचायतीमध्येही भोईर याने ग्राम विकास निधीमध्ये 82 हजार 500 रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे. या प्रकरणामुळे गणेश भोईर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.