
सामना प्रतिनिधी । हिंगोली
मध्यप्रदेशातून तेलंगणाच्या हैद्राबादकडे कत्तलीसाठी ट्रकमध्ये अमानुषपणे खचाखच कोंबून गोवंशाची वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी गुरूवारी सकाळी १० वाजता हिंगोली शहरातील नांदेड नाका परिसरात पकडला. पोलिसांनी या ५० गोवंशाची सुटका केली असून त्यामध्ये गायी व बैलांचा समावेश आहे. यामधील दोन पशुधन गुदमरुन दगावले असून अन्य पशुधनावर उपचार करुन सुटका करण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया हिंगोली शहर पोलीस ठाण्यात सुरु आहे.
हिंगोली शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्तव्यावर असतांना एम.पी. ०९ एच.एच. ४०७८ या क्रमांकाच्या ट्रकला थांबविण्याचा इशारा पोलिसांनी केला. मात्र, पोलीस असल्याचे पाहून नांदेड नाका परिसरातून हा ट्रक थेट हिंगोली शहराच्या गांधी चौकातून पुढे जवळा पळशी रस्त्याकडे चालकाने धुम ठोकली. दरम्यान, ही माहिती समजल्यावर वाहतूक पोलिसांसह हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे एपीआय सुधाकर आडे यांनी कर्मचाऱ्यांना ट्रक अडविण्याची सुचना केली. पोलीस पाठलाग करत असल्याचे लक्षात येताच रस्त्यावर ट्रक थांबवुन चालकाने धुम ठोकली. ट्रक जवळ येऊन पाहणी केल्यावर पोलिसांना त्यामध्ये गोवंश असल्याचे लक्षात आले.
ही माहिती समजताच शिवसेनेसह विश्व हिंदु परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी धाव घेतली. पोलिसांनी त्यांच्या मदतीने ट्रकमधील गायी व बैलांना बाहेर काढले. ट्रकमध्ये दोन कप्पे करुन ही ५० मुकी जनावरे अमानुषपणे कोंबण्यात आली होती. यापैकी २ पशुधनाचा मृत्यू झाला आहे. पशुसंवर्धन विभागाच्या वैद्यकीय पथकाने घटनास्थळी येऊन उपचार सुरु केले आहेत. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे एपीआय सुधाकर आडे यांनी सांगितले. हिंगोली नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनीही मुक्या जनावराच्या सुटकेसाठी प्रयत्न केले. शहरातील दानशूर नागरिकांनी या पशुधनासाठी तातडीने चारा-पाण्याची व्यवस्था केली. ट्रक पोलीस ठाण्याच्या आवारात आणण्यात आला आहे.

























































