
सामना प्रतिनिधी । बीड
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, दुष्काळी उपाययोजना तातडीने राबवल्या पाहिजेत, जनावरांसाठी छावण्या सुरू करा या मागण्यांसाठी संतप्त शिवसैनिकांनी सोमवारी अनोखे आंदोलन केले. बीडजवळील कुटेवाडी येथील एका कोरड्या विहिरीत 50 ते 60 शिवसैनिकांनी आंदोलनाला सुरुवात केली. दुपारपर्यंत हे आंदोलन सुरू होते. शिवसैनिकांच्या या आंदोलनाने प्रशासनाची मोठी धावपळ उडाली.
बीड जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर होऊन आता तब्बल दीड महिन्याचा कालावधी उलटला. अद्यापही दुष्काळी उपाययोजना मात्र सुरू झाली नाही. शेतकऱयांची आणि दुष्काळग्रस्त बीड जिल्हावासीयांची दिशाभूल करण्याचे काम सरकारने केले म्हणून संतप्त झालेले तालुकाप्रमुख गणेश वरेकर, उपजिल्हाप्रमुख जयसिंग चुंगडे आणि महिला आघाडीच्या जिल्हा संघटक संगीता चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील कुटेवाडी येथील 60 फूट खोल कोरडय़ा विहिरीमध्ये ठाण मांडून शिवसैनिकांनी आंदोलनाला सुरुवात केली. याप्रसंगी भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत कर्जमाफी झाली पाहिजे, मागेल त्याला टँकर मिळाले पाहिजेत, जनावरांच्या चाऱयाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी छावण्या सुरू झाल्या पाहिजेत, मजुरांच्या हाताला काम मिळाले पाहिजे अशा घोषणा देत आंदोलनाला सुरुवात केली. दुपारपर्यंत हे आंदोलन सुरूच होते. आंदोलनाची माहिती मिळताच बीडच्या तहसीलदारांसह महसूल आणि पोलीस प्रशासन घटनास्थळाकडे धावले.
































































