
सामना प्रतिनिधी । मालवण
हडी-कालावल खाडीपात्रालगत सुरू असलेल्या अनधिकृत वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधात धडक कारवाईस गेलेल्या महसूल व पोलीस पथकास जीवघेणा थरार अनुभवास मिळाला. तहसीलदार समीर घारे यांच्यासह दोन तलाठ्यावर वाळू माफियांकडून डंपर अंगावर घालण्याचा व जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली.
दरम्यान कारवाई दरम्यान पकडलेला डंपर वाळू माफियांनी पळवून नेला. यावेळी घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांवरही वाळू माफियांकडून दगडफेक झाली. घटनास्थळी आढळलेल्या चार दुचाकी जप्त करत त्या पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवत मालवण महसूल कर्मचाऱ्यांनी व पोलीस पाटील संघटनेने कामबंद आंदोलन छेडले. तर कालावल-कर्ली खाडी पात्रालगत असलेल्या लिलाव धारक अधिकृत वाळू व्यवसाईकांनीही घटनेचा निषेध नोंदवला आहे.
दरम्यान, या घटनेची रीतसर तक्रार तहसीलदार समीर घारे यांनी मालवण पोलीस ठाण्यात दिल्यानंतर संशयित चार जणांविरोधात सरकारी कामात अडथळा, हल्ला करणे, शिवीगाळ व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे महसूल कर्मचार्यांमध्ये घबराटीचे वातावरण असून जोपर्यंत संशयितांना तत्काळ अटक होत नाही तोपर्यंत कामबंद आंदोलन छेडण्याचा इशारा महसूलच्या कर्मचार्यांनी दिला आहे. त्यामुळे आज दिवसभर महसूलचे कामकाज ठप्प झाले होते.
कालावल खाडीपात्रालगत अवैधरीत्या वाळूची वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळताच तहसीलदार समीर घारे यांच्यासह नायब तहसीलदार साईनाथ गोसावी, मंडळ अधिकारी पवार, कंठाळे, डी. व्ही. तेली, बजबळकर, राणे, वायंगणी पोलिस पाटील सुनील त्रिंबककर, आचरा पोलिस पाटील विठ्ठल धुरी यांचे भरारी पथक हडी येथे दाखल झाले. रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान हडी मार्गेश्वर मंदिराच्या पाठीमागील कालावल खाडीपात्रात वाळूचा उपसा करून डंपर क्रमांक एम. एच. ०७ सी- ५२९७ मधून वाहतूक केली जात होती. हा डंपर महसूलच्या पथकाने अडविला असता डंपर चालक गुंडू पोमन्न राठोड रा. चौके याच्याकडे कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्याच्यावर दंडात्मक कारवाई सुरू केल्यानंतर डंपर चालकाने डंपरमधील अर्धी वाळू ओतली. त्यानंतर तेथे आलेल्या योगेश भिसळे याने हुज्जत घालत उर्वरित डंपर रिकामी केला. या कारवाईचा पंचनामा सुरू असताना रात्री साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान गुरुप्रसाद आचरेकर याने डंपर पळवून नेण्याचा प्रयत्न केला असता त्याला अटकाव करण्यास गेलेले तहसीलदार समीर घारे, तलाठी कंठाळे व तेली यांच्या अंगावर डंपर घालत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आचरेकर याने डंपर हडी आचर्याच्या दिशेने पळवून नेला. हा डंपर चौके येथील अमोल चव्हाण यांच्या मालकीचा असल्याची माहिती मिळाली आहे.
डंपर अंगावर घालण्याचा प्रयत्न केल्याने महसूलच्या कर्मचार्यांमध्ये घबराट पसरली. घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या पोलीसांवरही वाळू माफियांनी दगडफेक केली. त्यानंतर वाळू माफियांनी तेथून पळ काढला. अखेर महसूलच्या भरारी पथकाने तेथे आढळलेल्या दुचाकी क्रमांक एम. एच. ०७ एके- ६३०९, एम. एच. ०७ एल- २८३०, एम. एच. ०७ एके- ५७६२ तसेच नंबरप्लेट नसलेली एक अशा चार दुचाकी जप्त करून त्या पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत.
महसूल कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
तहसीलदारांसह तलाठ्यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न झाल्याने महसूल कर्मचार्यांनी निषेध नोंदवला आहे. त्यामुळे जोपर्यंत संशयितांवर अटकेची कारवाई होत नाही तोपर्यंत बेमुदत कामबंद आंदोलन छेडण्यात आले आहे. यात महसूलचे ५ अधिकारी, ६५ कर्मचारी तसेच सर्व मंडळ अधिकारी, तलाठी सहभागी झाले आहेत. या घटनेचा तीव्र निषेध करत पोलिस पाटील संघटनेनेही या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे.






























































