अचानक बदललेल्या लाईफ स्टाईलने तो फसला आणि कोठडीत जाऊन बसला: चोरीचा पैसा पचलाच नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

पुणे जिल्ह्यातील खडक पोलीस ठाण्यातंर्गत चोरीला गेलेल्या सोन्याचे दागिने व नगदी असा ९ लाख रुपयांचा आणि नांदेडच्या शिवाजीनगर भागातील भाग्यलक्ष्मी सुपर मार्केटमधून ३ लाख २८ हजार रुपयांचा दरोडा घालणाऱ्या आरोपीस नांदेड पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी आज भरगच्च पत्रकार परिषदेत दिली. अचानक बदललेल्या लाईफ स्टाईलने तो फसला. शेजाऱ्यांना आला संशय आणि तो कोठडीत जाऊन बसला. चोरीचा पैसा पचलाच नाही!

नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील इकळीमोर येथे राहणाऱ्या विलास दिगंबरराव पांचाळ यांच्या राहणीमानात अचानक फरक झाला. एका रात्रीच चैनीत राहू लागलेल्या विलासला अचानक कसा, कुठला आर्थिक फायदा झाला याची चर्चा होऊ लागली आणि याची गुप्त माहिती नांदेड पोलिसांना मिळाली आणि पोलिस तपासात तो गजाआड झाला.

पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, गेल्यावर्षी भाग्यलक्ष्मी सुपर मार्केट येथून चोरी झालेल्या प्रकरणाचा आम्ही तपास करीत होतो, त्याच सुमारास नुसार इकळीमोर येथे राहणाऱ्या विलासच्या विलासी आयुष्यमानाचा संशय आलेल्या खबऱ्यांनी माहीती दिल्यानंतर सदर आरोपीला अत्यंत गोपनिय पध्दतीने ताब्यात घेतले आणि विचारपूस केली. त्यानुसार त्याने भाग्यलक्ष्मी सुपर मार्केट येथे चोरी करुन सोन्याचे दागिने पळविले होते. त्यातील तीन लक्ष २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुण्याच्या खडक पोलीस ठाण्यातंर्गत सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्याने आपले दागिने दुचाकीच्या डिक्कीत ठेवले आणि तो बाजूला आपल्या सहकाऱ्याशी बोलत असतानाच गाडीसह आरोपी पांचाळने सोन्याचे दागिने व नगदी ऐवज पळविला. एकूण ९ लक्ष रुपयांचा हा ऐवज होता. नांदेड पोलिसांनी हा ऐवज जप्त केला असून या दोन्ही प्रकरणातील आरोपी असलेल्या पांचाळ यास अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून आणखी काही माहिती उघडकीस येण्याची शक्यता असून, महाराष्ट्रातल्या त्यांच्या साथीदारांचा यात काही सबंध आहे का याचा तपास पोलीस करीत असल्याचे संजय जाधव यांनी सांगितले. यावेळी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे व त्यांचे सहकारी उपस्थित होते.