PUBG – मोदींचा सवाल तुमचा मुलगा ‘पबजी’ खेळतो का?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन,नवी दिल्ली

शाळेत जाणाऱ्या मुलांपासून ते नोकरी करणाऱ्या लोकांपर्यंत सर्वांनाच ‘पबजी’ या ऑनलाईन गेमने वेड लावले आहे. या वेडापायी मुलांनी अभ्यासावर पाणी सोडले आहे. त्यामुळे पालकही चिंताग्रस्त झाले आहेत. नवी दिल्ली येथे मंगळवारी पार पडलेल्या ‘परीक्षा पे चर्चा-2’ या कार्यक्रमात एका चिंताग्रस्त पालकाने याविषयी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोरच गाऱ्हाणे मांडले. पालकांनी ऑनलाईन गेमविषयी प्रश्न विचारताच ‘तुमचा मुलगा पबजी खेळतो का… फ्रंटलाईनवाला आहे का…? असा प्रतिप्रश्न मोदींनी करताच सभागृहात हास्यकल्लोळ झाला.

नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टोडियममध्ये पंतप्रधान नरेंद मोदी  यांनी देशातील निवडक विद्यार्थी, शिक्षक, पालकांसोबत थेट आणि व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधला. मूळच्या आसामच्या आणि सध्या दिल्लीत स्थायिक झालेल्या मधुमिता सेनगुप्ता यांनी मोदींना ऑनलाईन गेम्सच्या वाढत्या क्रेझविषयी प्रश्न विचारला. ‘माझा मुलगा नववीत असून तो अभ्यासात हुशार होता. पण हल्ली ऑनलाईन गेम्समुळे त्याचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असून यावर काय उपाय करता येईल, असा प्रश्न सेनगुप्ता यांनी मोदींना विचारला. यावर मोदींनी एक सल्ला दिला. तुमचा मुलगा मोबाईलवर गेम खेळत असेल तर त्याला याच मोबाईलच्या माध्यमातून माहितीदेखील मिळविता येते हे पटवून सांगावे.