
सामना ऑनलाईन, कोलकाता/नवी दिल्ली
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील मोदी सरकारविरुद्ध आर-पारची लढाई सुरू केली आहे. ‘‘रविवारपासूनचे धरणे आंदोलन 8 फेब्रुवारीपर्यंत सुरूच राहील़ माझे प्राण गेले तरी बेहत्तर; पण आता मागे हटणार नाही, तडजोड करणार नाही’’, असा आक्रमक पवित्रा घेत ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. दरम्यान, राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी एक गोपनीय अहवाल तयार केला असून केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठविला आहे. सीबीआय
आणि पश्चिम बंगाल सरकार वादावर सर्वोच्च न्यायालयात उद्या (दि. 5) सुनावणी होणार आहे.
शारदा चिटफंड आणि रोझ व्हॅली घोटाळ्याचे तपासप्रमुख कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार आहेत. राजीव कुमार यांनी महत्त्वाचे कागदपत्रे गहाळ केली, पुरावे नष्ट केले, असा आरोप करीत सीबीआयने त्यांना नोटीस बजावली होती. मात्र, राजीव कुमार सीबीआय कार्यालयात हजर झाले नाहीत. त्यामुळे रविवारी सीबीआयचे पथक राजीव कुमार यांच्या निवासस्थानी धडकले; यावेळी पोलिसांनी या पथकाला अडविले. पोलीस अधिकारी आणि सीबीआय अधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आक्रमक पवित्रा घेत मोदी सरकारकडून सीबीआयला हाताशी धरून विरोधी पक्षांच्या सरकारांवर दडपशाही केली जात आहे, असा आरोप केला आहे. ममता बॅनर्जी यांच्या भूमिकेला अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पाठिंबा दिला आहे.
आक्रमक पवित्रा
ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला. प्राण गेले तरी बेहत्तर; पण आता मागे हटणार नाही, तडजोड करणार नाही. जेव्हा तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना पकडले तेव्हा मी आंदोलन केले नव्हते; परंतु जेव्हा कोलकाता पोलीस आयुक्तपदाचा अपमान केला गेला तेव्हा माझा संताप झाला. मोदी सरकारला पोलिसांचा असा अपमान करण्याचा अधिकार नाही, असा हल्लाबोल ममता बॅनर्जी यांनी केला.
आयपीएस अधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते!
पश्चिम बंगाल सरकार आणि सीबीआय यांच्यात सुरू असलेल्या वादावर राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी एक गोपनीय अहवाल तयार केला असून, केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठविला आहे. दरम्यान, सीबीआयच्या कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली गृहमंत्रालय पश्चिम बंगालमधील आयपीएस अधिकाऱ्यांवर कारवाई करू शकते, असे वृत्त आहे. ही कारवाई जर मोदी सरकारने केली तर हा वाद आणखी चिघळणार आहे.
धरणे आंदोलन स्थळावरूनच कामकाज
मोदी सरकारविरुद्ध रविवारपासून ममता बॅनर्जी यांनी मेट्रो चॅनल स्टेशन येथे धरणे आंदोलन सुरू केले आहे. 8 फेब्रुवारीपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे. रविवार रात्रीपासून तृणमूल काँग्रेसचे अनेक नेते, कार्यकर्ते येथे येत आहेत. ममतादीदींसह अनेकांचा मुक्काम धरणास्थळावर आहे. धरणास्थळावरूनच ममता बॅनर्जी राज्य सरकारच्या कामकाजावर लक्ष ठेवून आहेत. येथूनच त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या एका कार्यक्रमात फोनवरून भाषण केले. तसेच शेतकऱ्यांच्या मेळाव्यालाही संबोधित केले. 2006 मध्ये ममता बॅनर्जी यांनी सिंगुर येथील टाटा नॅनो प्रकल्पाविरुद्ध येथूनच लढा उभारला होता. 26 दिवसांचे उपोषण केले होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत डाव्या पक्षांचे सरकार जनतेने उलथून टाकले होते.



























































