
सामना ऑनलाईन । मुरबाड
ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड येथे एका शेतकऱ्याच्या गोठ्याला लागलेल्या आगीत दोन म्हशींचा मृत्यू झाला असून पूर्ण गोठा जळून खाक झाला आहे. मंगळवारी रात्री मुरबाड तालुक्यातील बोरगाव शिंदी पाडा येथील गणेश राऊत यांच्या गोठ्याला अचानक आग लागली. गोठ्याला आग लागल्याचे कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र तो पर्यंत संपूर्ण गोठा जळून खाक झाला. तसेच गोठ्यात बांधलेल्या दोन म्हशींचा होरपळून मृत्यू झाला.
गणेश राऊत यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह म्हशींपासून मिळणाऱ्या उत्पन्नावरच होत होता. मात्र आग लागल्यामुळे त्यांचे उत्पन्नाचे साधनच नष्ट झाले असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. पुर्व वैमनस्यातून कुणीतरी गोठ्याला आग लावली असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. त्यामुळे लवकरात लवकर आरोपीला अटक कठोर कारवाई करावी. तसेच आपल्याला प्रशासनाने योग्य नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी पीडित शेतकऱ्याने केली आहे.



























































